आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलधार यात्रेसाठी जाणाऱ्या ४ भाविकांवर काळाची झडप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिक पाौर्णिमेनिमित्त मन्मथस्वामींच्या समाधी सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला समोरून ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना बीडजवळील आहेर वडगाव फाट्याजवळ बुधवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. मृत आणि जखमी सर्व कंधार तालुक्यातील (जि. नांदेड) रहिवासी आहेत. जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कपिलधार येथे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत मन्मथस्वामी यांचा कार्तिक पौर्णिमेला समाधी उत्सव असतो. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून लाखो भाविक, दिंड्या यात्रेसाठी येत असतात. कंधार तालुक्यातील भाविकही कपिलधार यात्रेसाठी रिक्षातून निघालेले हाेते. त्यांची रिक्षा (एमएच २६ के १६२५) सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील अाहेर वडगावजवळ येताच मांजरसुंब्याहून बीडकडे येणाऱ्या ट्रकने (एमएच ३१ डब्ल्यू ४०२३) धडक दिली. या अपघातात शंकर गुरपतअप्पा मठपती (४५), अस्मत बाबूराव स्वामी (५०), महादाबाई बालाजी झुंबाड (४५, सर्व रा. बाेरी वरखड) व सुलोचना नागनाथ गुडमे (६०, रा. कळकावाडी) या चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर गोविंद शंकर मंगे, गोकर्णा गोविंद मंगे, लक्ष्मीबाई बाबूराव पांचाळ, गोदाबाई नागोराव आसुरे, नागोराव शंकरराव आसुरे, मीराबाई शंकर चांदोळकर, बालाजी सदाशिव कापसे, महानंदा माधव अासुरे, संभाजी तानाजी नालापल्ले (सर्व रा. बोरी, ता.कंधार, जिल्हा नांदेड) हे नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटलेला ट्रक झाडावर आदळला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला.
आमदार चिखलीकर संपर्कात
अपघातातील अनेक जण कंधार तालुक्यातील बोरीचे रहिवासी आहेत. चार जणांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता रिक्षाने कपिलधारकडे निघालेली ही मंडळी बुधवारी निष्प्राण देहाने रुग्णवाहिकांमधून गावी परतली. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही बीड रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधून जखमींची विचारपूस केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, मृतकांचे फोटो व संबंधित माहिती..

प्रा. धोंडे यांची भेट
अपघाताची माहिती कळताच शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली. बीडचे अनेक सामाजिक कार्यकर्ते अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेनच्या साहायाने अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या कडेला काढण्यात आला, तर ट्रक जप्त करून पोलिस मुख्यालयात आणला आहे.
रुग्णालयाची तत्परता
अपघातानंतर बीड जिल्हा रुग्णालयाने तत्परता दाखवून जखमींच्या नातेवाइकांसाठी चहा, नाश्त्याची व्यवस्था केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हे पहाटेपासून उपचारांवर लक्ष ठेवून होते. मृतदेह दोनशे किलोमीटरवर जाणार असल्याने शवविच्छेदनातही तत्परता दाखवली. मृत महादाबाई झुंबाड यांचे कुटुंबीय कंधार तालुक्यातील राजकारणात मातब्बर असून त्यांच्याच कुटुंबीयांकडे बोरी येथील सत्ता चाळीस वर्षांपासून असल्याची माहिती नागरिकांनी दिली.