आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना- दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेश-बिहारमधील असल्याचा आरोप राज ठाकरे करतात, मग औरंगाबादमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार करणारे आरोपी कुठले आहेत, याचा जाहीर खुलासा का करीत नाहीत, असा सवाल समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अबू आझमी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये येऊन असे वक्तव्य करून दाखवा,असे आव्हान राज ठाकरे यांना दिले. आझमी यांचे भाषण सुरू असताना सभेच्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
समाजवादी पार्टीच्या वतीने जालना शहरातील मामा चौकात दुष्काळ आणि सच्चर समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी मराठवाडास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निर्दोष असताना त्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या निर्दाेष लोकांची सुटका करून त्यांना मोबदला देण्यात यावा. धुळे दंगल प्रकरणात केवळ दोन पोलिसांना जबाबदार धरून सरकार मोकळे झाले आहे. मात्र, या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षका-या ना निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे देशाचे तुकडे करण्याची भाषा करीत आहेत. ते केवळ महाराष्ट्रातच असे आरोप करतात. मी मात्र औरंगाबाद, जालना, परभणी, जिंतूर आदी ठिकाणी जाऊन बोलतो. तसे त्यांनी पाटणा किंवा लखनऊमध्ये जाऊन बोलून दाखवावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीका
हिंदुत्ववादी संघटना दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे वारंवार सांगत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. सिमीविरुद्ध कोणतेही पुरावे नसताना सन 2001 मध्ये बंदी घातली तशी कारवाई अभिनव भारत, सनातन संस्था आणि अन्य संस्थांवर करण्याची मागणीही त्यांनी केली.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
आझमी यांचे भाषण सुरू असतानाच मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याच वेळी सभेला उपस्थित असलेल्या श्रोत्यांनीही उभे राहून घोषणाबाजी केली. काहींनी सभेच्या ठिकाणाहून मनसेच्या कार्यकर्त्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. गोंधळ झाल्यानंतर पुन्हा आझमी यांचे भाषण सुरू झाले. कोणी कितीही घोषणाबाजी करीत असेल तर करू द्या, तुम्ही हत्तीप्रमाणे आपल्या पद्धतीने चालत राहा, असा सल्ला त्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.