आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पाणी पिकवून शेती फुलवायची : ठोंबरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर नॅचरल उद्योग समूहाच्या बी. बी. ठोंबरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्याला बाहेर काढण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. ठोंबरे यांनी एन. साई, नॅचरल दूध या माध्यमातून कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, दुधासारखा जोडधंदा या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्याचे एक मॉडेल यशस्वी करून दाखवले आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासासाठीच्या नक्की काय संकल्पना आहेत याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- मराठवाड्याची मुख्य समस्या काय आहे असे आपणास वाटते?
उत्तर- मराठवाडासध्या एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. पाणी नाही, शेती पिकत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत. आर्थिक उलाढाल मंदावली आहे. त्याचा फटका समाजातल्या प्रत्येकाला बसतो आहे. पण यातून मार्ग काढता येणे शक्य आहे. मराठवाडा कमी पावसाचे क्षेत्र आहे हे मान्यच करावे लागेल. पाण्याअभावी शेती पिकत नसल्यामुळे सगळ्यांचा पोशिंदा असलेला इथला शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला मदतीचा हात देऊन संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे. मराठवाड्यात मोठे उद्योग नाहीत. ते यावेत यासाठी प्रयत्न झाले असले तरी पाणी ही इथली मुख्य समस्या आहे. त्यामुळे पहिल्यांदा मराठवाड्यात पाणी पिकवणे गरजेचे आहे. पावसाचा पडलेला थेंबन् थेंब तेथेच मुरवण्याचे काम झाले पाहिजे. नाले, नद्या, तळे, विहिरींतून ते साठवले पाहिजे.

प्रश्न- पाणी पिकवणे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे?
उत्तर- पाऊसबेभरवशाचा झाला आहे. वीस-वीस दिवस पाऊस पडत नाही आणि एकाच रात्री धो-धो बरसून तो महिन्याची सरासरी पूर्ण करतो. तो जमिनीत मुरत नाही. सगळा नदीद्वारे वाहून जातो. सरकारी आकड्यानुसार पाऊस पडलेला असला तरी शेतीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. जानेवारीपासूनच टंचाई जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे नाल्यांचे खोलीकरण करणे, तळ्यांतला गाळ काढणे, नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, विहिरींचे पुनर्भरण करणे ही कामे प्राधान्याने करावी लागतील. प्रत्येक गावात, प्रत्येक शिवारात हे काम व्हायला पाहिजे. शहरांमध्येही प्रत्येक घरात पुनर्भरण झालेच पाहिजे. यातून आपल्याजवळ हक्काचे पाणी उपलब्ध होईल.

प्रश्न- शेतीमालाला भावही मिळत नाही...
उत्तर- शेतीमालाचेभाव ठरवण्याची ताकद अजूनही शेतकऱ्यांमध्ये आलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उभारण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना काम मिळेल. शहरांकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे जास्त पैसे मिळतील. व्यापाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
बातम्या आणखी आहेत...