आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हितचिंतकांनीच डिग्रीचा मुद्दा काढून खोटी तक्रार केली, लाेणीकर यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मी राज्यभर फिरत आहे, चांगले काम करत आहे, परंतु काही हितचिंतक मित्रांना यामुळे दु:ख झाले असेल, त्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात खोटी तक्रार केली आहे. परंतु आपण कोणतेही खोटे काम केले नाही, हेराफेरी केली नाही. त्यामुळे पक्ष सरकार आपल्या पाठीशी उभे राहिले आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा स्वच्छता पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. भाजपच्या वतीने आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. आंबेडकर सभागृहात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास लोणीकर यांच्यासह अामदार संतोष दानवे, नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव, प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री लोणीकर यांनी या प्रकरणावर भाष्य केले. आपले आई-वडील गरीब असल्यामुळे पाचवीपर्यंतच शालेय शिक्षण घेता आले. पदवी घ्यायचीच असे स्वप्न असल्याने आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रीतसर अर्ज करून प्रवेश घेतला. लालबहादूर शास्त्री विद्यालय परतूर येथे प्रथम परीक्षा दिली उत्तीर्ण झालो, त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. सरस्वती भुवन कॉलेज औरंगाबाद येथे दुसरी परीक्षा दिली, परंतु आमदार जिल्हाध्यक्ष होतो त्यामुळे अनेक प्रश्न, समस्या होत्या. अभ्यास करता आला नाही त्या परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत मी जे शपथपत्र दिले त्यावर बी. ए. प्रथम वर्ष लिहिले. विद्यापीठ वकिलांशी चर्चा करूनच तसे लिहिले. परंतु पुढच्या काळात परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही त्यामुळे बी.ए. लिहिणे माझ्या मनाला पटले नाही, त्यामुळेच आता जी वस्तुस्थिती आहे ती लिहिली. आपण खोटे शिक्के, प्राचार्यांची खोटी सही आणली नाही. हितचिंतकांना ते पटले नाही, त्यामुळे तक्रार केली. मात्र, कुठेच चुकीचे काम केलेले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्ष आणि सरकार आपल्या पाठीशी उभे राहिल्याचे लोणीकर याप्रसंगी म्हणाले.
दानवेंकडून समर्थन
बबनरावलोणीकर यांनी बी.ए. प्रथम वर्ष लिहिले काय किंवा पाचवी लिहिले काय, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. दिल्लीचे माजी मंत्री तोमर यांनी खोटी डिग्री मिळवली, त्याच्यावर वकिली करून पैसे कमावले. त्याच्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु लोणीकर यांच्याबाबत तसे काहीच नाही, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंत्री लोणीकर यांचे समर्थन केले.

भाजपा जनसंवाद कार्यक्रमांतर्गत जालन्यात आयाेजित कार्यक्रमात सहभागी झालेले पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अामदार नारायण कुचे, संतोष दानवे जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव आदी. छाया:जावेद तांबोली