हिंगोली - एकीकडे देशाच्या 69 व्या स्वातंत्र्य दिनाची पहाट उगवत होती तर दुसरीकडे गावात कुठल्याच आरोग्य सुविधा नसल्याने शेत मजूर कुटुंबातील एक स्त्री प्रसूती वेदनेने विव्हळत होती. घरात केवळ पती आणि पत्नी दोघेच. नाही म्हणायला लाइटाचा मिणमिणता प्रकाश. अशातच पहाटे पाच वाजताच्या सुमारास पत्नी प्रसूत झाली. पण, नाळ कापायलाही जवळ काहीच नव्हते. त्यामुळे तिच्या नवऱ्याने थरथरत्या हाताने कुऱ्हाड उचलली आणि नाळ कापण्याचा प्रयत्न केला. पण, घात झाला नि नाळेसोबतच नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीचा गळाही कापला गेला. ही हृदयहेलावून टाकणारी घटना घडली जिल्ह्यातील दाताडा बु. (ता. सेनगाव) या गावात. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्या दुर्दैवी बापाला अटकही केली आहे.
देशात अच्छे दिन येणार म्हणून विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी ग्रामीण भागात अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी हे तर सोडाच. पण, अत्यावश्यक असलेली आरोग्य सेवाही जिल्ह्यातील 70 टक्के गावांत नाही. यातून एका नवजात चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला.
अशी घडली घटना
दाताडा बु. (ता. सेनगाव) येथील दिगंबर तुकाराम कदम (57) आणि त्यांची पत्नी प्रयागबाई (48) हे शेतमजूर दाम्पत्य. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रयागबाईला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. दिगंबर हे शेजाऱ्यांकडे मदत मागायला जाणार तोच प्रयागबाई यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण, मुल बाहेर येताच नाळ कापणे आवश्यक असल्याने दिगंबर यांनी कुऱ्हाडीने नाळ कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हात थरथरत असल्याने नाळ कापण्याऐवजी चिमुकलीचा गळाच कापल्या गेला. नंतर दिंगबर यांनी या बाबत ग्रामस्थांना माहिती दिली. प्रयागबाईंना आपले दु:ख अनावर झाले. पोलिसांनी घटनास्थळी येत दिगंबर यांना अटक केली.