आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या हत्येप्रकरणी परंड्यात कडकडीत बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - शहरात मांस विक्रीच्या कारणावरून बुधवारी दुपारी भोसकण्यात आलेल्या तरुणाचा गुरुवारी पहाटे २.३० वाजता बार्शी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परंड्यात तणावाचे वातावरण पसरले असून तरुणावर अंत्यसंस्कार होईपर्यंत बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

परंडा शहरातील मांसकटाई करणा-या व्यावसायिकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे; परंतु मांस विक्री करून उपजीविका भागवणा-या हैदरअली शेख याच्यापुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याने बाहेरून मांस आणून परंड्यात विक्री करण्यास प्रारंभ केला. याच कारणावरून बुधवारी (दि.११) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सद्दाम कुरेशी व सलमान कुरेशी या दोघांनी हैदरअली याला काठीने मारहाण केली. याच वेळी सलमान याने चाकूने हैदरअलीच्या पोटात घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत हैदरअलीला उपचारासाठी बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु मध्यरात्रीनंतर २.३० वाजेच्या सुमारास हैदरअलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत माहिती कळताच गुरुवारी सकाळपासूनच परंडा शहरात तणावाचे वातावरण होते. संपूर्ण शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान हैदरअलीचा मृतदेह घरी आणण्यात येऊन नंतर दफनविधी करण्यात आला. या वेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दफनविधीनंतर व्यवहार
व्यापा-यांनीही दफनविधीनंतर आपली दुकाने उघडली. घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांनी परंडा शहराला भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रीती टिपरे परंड्यात तळ ठोकून आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना बुधवारीच अटक करण्यात आलेली आहे.