आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Transactions In Vaijapur Stopped For Third Day

२५ कोटींची उलाढाल ठप्प, सलग तिस-या दिवशी वैजापुरात बँक व्यवहार कोलमडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - शहरात राष्ट्रीयीकृत बँकांची इंटरनेट सेवा तांत्रिक बिघाडामुळे लागोपाठ तिस-या दिवशी ठप्प असल्याने बँक व्यवहाराचे कामकाज कोलमडले होते. दरम्यान सलग तीन दिवसांपासून बँक कारभार बंदमुळे ग्राहकांना आर्थिक कोंडीचा मोठा मनस्ताप सोसवा लागला. जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा व्यवहार कोलमडल्याचा फटका बँकांना बसला असल्याचे बँकांच्या सूत्रांनी सांगितले.

शहरातील राष्ट्रीय बँकांना दूरसंचार कार्यालयाकडून बँकिंग व्यवहारासाठी विशेष ओएफसी इंटरनेट वाहिनीची सेवा दिली आहे. सदरील वाहिनीची केबल सोमवारपासून तुटल्याने लीजलाइनवर इंटरनेटद्वारे कनेक्ट राहणा-या तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहेत. वहिनीच्या दुरुस्तीचे काम दूरसंचार विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने रखडले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा मानल्या जाणा-या अक्षय्यतृतीयेच्या उत्सवासाठी मंगळवारी ग्राहकांना बँकेतून हातात पैसे मिळू न शकल्याने खरेदीचा हिरमोड सहन करावा लागला. बँकेचे कामकाज तांत्रिक बिघाडामुळे अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर पाणी फेरले गेल्याने ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारीही दिवसभर कामकाज ठप्प असल्याने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार कोलमडले होते.

शहरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये सोमवारपासून दुपारी तांत्रिक अडचण निर्माण झाली. बुधवारी सलग तिस-या दिवशीदेखील हा बिघाड कायम असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचे ऑनलाइन व्यवहार ठप्प होते. तात्पुरता बिघाड असून तो दूर होईल या आशेवर काही नागरिकांनी दुपारच्या सत्रानंतर बँकेत विचारपूस केली असता व्यवहार सुरू झाले नव्हते. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचे नियोजन नागरिकांनी केले होते. त्यामुळे मंगळवारी खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकेत धाव घेतली मात्र दुस-या दिवशीही कनेक्टिव्हिटीची समस्या दूर झालेली नव्हती. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच व्यवहार सुरू झाले नव्हते. बँकेत रोख जमा करणे, रोख काढणे, ट्रान्सफर करण्यासह इतर सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. ओएफसी वाहिनीत लासूर-स्टेशनजवळ बिघाड झाल्याने नादुरुस्त झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या लीजलाइनची सेवा विस्कळीत झाली होती. तसेच शहरातील काही भागातील ब्रॉडबँण्डही बंद झाले होते. या बिघाडामुळे शहरातील भारतीय स्टेट बँक, हैद्राबाद स्टेट बँक, महाराष्ट्र बँक या सरकारी बँकांसह काही खासगी बँकांमधील कामकाज दिवसभर बंद होते. यामुळे लाखो रुपयांचा व्यवहार होऊ शकला नाही. एटीएमसुद्धा बंद पडल्याने खातेधारकांची चांगलीच अडचण झाली.

बँकेकडून ग्राहकांना कमी रकमेचा पुरवठा
शहरातील काही बँकांनी मंगळवारी व्ही-सेटच्या माध्यमातून जमा होत असलेल्या रकमेतूनच व्यवहार सुरू केला. मात्र त्यातून नागरिकांना अपेक्षित असलेल्या रकमांचे वितरण करता आले नाही. बँकेमार्फत व्यवहार करणा-या व्यापारीवर्गाला सर्वात मोठा फटका तीन दिवस बँक कारभार बंद असल्याने बसला. तालुक्यातील गंगुबाई काळवे यांनी हैदराबाद बँकेच्या शाखेत ३० हजार रुपयांचे विड्रोल भरून दिले होते, मात्र त्यांना अवघे ५ हजार रुपयेच देण्यात आले. या तुटपुंज्या रकमेमुळे त्यांना अपेक्षित असलेले काम करता आले नाही.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
याबाबत दूरसंचार विभागातील सूत्रांनी सांगितले की लासूर स्टेशन येथे भारनियमन सुरू झाल्यामुळे लीजलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र तत्काळ जनरेटर दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी आणखी एक जास्तीचा जनरेटर मागवण्यात आला असून गुरुवारी ही समस्या दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तांत्रिक बिघाड
लासूर स्टेशनजवळ बीएसएनएलची ओएफसी केबल ब्रेक झाली आहे. त्यामुळे आमच्या लीजलाइनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. आम्ही आमच्या परीने यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
रूपचंद नंदागवळी, व्यवस्थापक, एसबीएच