आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीपुरी शिवारात साकारणार बायोडायव्हर्सिटी पार्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे लवकरच बायोडायव्हर्सिटी पार्क (जैवविविधता पार्क) साकारणार आहे. २४.८५ हेक्टर क्षेत्रावर होऊ घातलेल्या या पार्कसाठी ७० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी १०० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड केली जाणार आहे.

तापमानातील वाढ आणि हवामानातील बदल या घटकांबाबत जागतिक स्तरावर विचारमंथन सुरू आहे. घटते वनक्षेत्र हादेखील चिंतेचा विषय ठरतो आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्क्यांच्या जवळपास वनाच्छादन आहे. मराठवाड्यात १२ टक्के तर जालना जिल्ह्यात फक्त १.२९ टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्के असणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील वायू, ध्वनी व जलप्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध जागांवर वृक्ष लागवड आणि उद्यानाची निर्मिती करून जैवविविधतेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन शासनाने अंबड तालुक्यातील दहीपुरी गावशिवारात "बायोडायव्हर्सिटी पार्क' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानिक भौगोलिक परिस्थिती, हवामान, पावसाचे प्रमाण, मातीचा स्तर आणि पाण्याची उपलब्धता याचा विचार करून नियोजित वृक्ष लागवडीसंदर्भात निकोप, उत्कृष्ट, दर्जेदार आणि आवश्यक त्या उंचीच्या रोपांची उपलब्धता होण्यासाठी नियोजन सुरू आहे.

वने ही अनमोल संपत्ती
वने ही मानवाला मिळालेली अनमोल अशी संपत्ती आहे. मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी दुर्मिळ निसर्गसंपदेचे जतन, संवर्धन, विकास आणि व्यवस्थापन करून हा ठेवा पुढील पिढ्यांना आपण हस्तांतरित करू शकतो. पर्यावरण समतोल व संतुलन साधून विकासाचे प्रकल्प राबवणे हे
सद्य:स्थितीत मोठे आव्हान आहे.
जनजागृती गरजेची
जनतेमध्ये वन, वन्यजीव, जैवविविधता, वृक्षाच्छादन वाढवणे आणि पर्यावरणाचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण करणे, तसेच जागतिक तापमानातील बदल व हवामानातील बदल याची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने जनतेमध्ये विचारमंथन घडवून आणणे आणि उपाययोजना सुचवून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणे, हासुद्धा यामागचा उद्देश आहे.
व्ही. एन. सातपुते, उपवनसंरक्षण अधिकारी, जालना