आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Courageous, Don't Committee Suicide, Union Team Appeal To Farmers

धीर धरा, आत्महत्या करू नका - केंद्राच्या पथकाची शेतक-यांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्राच्या पथकाने सोमवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड जिल्ह्यांत दुष्काळी स्थितीची पाहणी केली. धीर धरा, हिंमत बांधा, आत्महत्या करू नका, सरकार दरबारी आम्ही वास्तव मांडू, अशी भावनिक फुंकर पथकातील काही सदस्यांनी शेतक-यांच्या जखमांवर घातली.

जालना/ उस्मानाबाद - केंद्राच्या चार सदस्यीय पथकाने सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना पथकाने तीन तासांच्या धावत्या दौ-यात रूटवरच्या सहा गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली. धीर धरा, हिंमत बांधा, आत्महत्या करू नका, सरकार दरबारी आम्ही तुमचं वास्तव मांडू, अशी भावनिक फुंकर
घालत पथक पुढे मार्गस्थ झाले.
दुष्काळ पाहणीच्या पूर्वनियोजनानुसार पथक सकाळी ९.३० वाजता साेमठाणा प्रकल्पावर पोहोचणार होते; परंतु पथकाने तत्पूर्वी गेवराई बाजार (ता.बदनापूर) येथील सुधाकर जोशी यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली, तर तुळशीराम कान्हेरे यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली. गोकुळवाडी येथे राम भडांगे यांच्या शेतातील विहिरीच्या पाणीपातळीची पाहणी केली. ही विहीर पूर्ण कोरडी हाेती. त्यानंतर पथक सोमठाणा प्रकल्पावर पोहोचले. या प्रकल्पाने २० ते २५ गावांचे क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, सध्या तलाव कोरडा आहे. नियोजित दौ-यापेक्षा पथक एक तास उशिरा साेमठाणा येथे पोहोचले, तरी ग्रामस्थ थांबून होते. त्यानंतर पथकाने बदनापूरपासून जवळच असलेल्या जालना रोडवरील शेषराव जऱ्हाड या शेतक-यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तेथून पुढे पथक देऊळगावराजा रोडवरील गोंदेगाव येथे पोहोचले. येथे ऋषीधर उत्तमराव तिडके यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. येथेही जवळपास १५० हून अधिक शेतकरी दोन तास पथकाच्या प्रतीक्षेत होते. पथकाने मात्र एकाच शेतक-याला प्रश्न विचारून संवाद साधला, तर त्यानंतर पथकाने याच रूटवरील वाघ्रुळ जहांगीर येथील नामदेव खरात यांच्या शेतातील आंतरपीक आणि कपाशीच्या पिकाची पाहणी केली.
रूटवरचीच निवडली गावे
पथक औरंगाबादहून जालन्यात आले. पुढे ते वाशीम जिल्ह्यात जाणार होते. त्यामुळे याच रूटवरची गावे निवडण्यात आली. त्यातही महामार्गाशेजारच्या शेतानाच पथकाने भेटी दिल्या. सोमठाणा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मात्र पथकाला जालना-औरंगाबाद रोडपासून सहा किलोमीटर वाट वाकडी करावी लागली.
पथकात यांचा होता समावेश
पथकात कापूस पणन संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग, उपायुक्त चंद्रा शेखर साहुकार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहायक सल्लागार विजयकुमार बाथला, भारतीय खाद्य निगमचे विभागीय महाव्यवस्थापक सुधीर कुमार यांचा समावेश होता.
प्रशासनापुढे होता प्रश्न
पथकाने केवळ अवघ्या दीड ते दोन तास वेळ देण्याचे सांगितल्याने इतक्या कमी वेळेत पथकाला काय दाखवणार, असा प्रश्न प्रशासनापुढेही होता. त्यातही एका गावात पीक पाहणी असेल तर दुस-या गावात कोरडा पडलेला तलाव किंवा इतर काही तरी समस्या दाखवा, असे उपसचिवांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पथकासाठी अशाच गावांची निवड केल्याचे सूत्रांनी सांगितले.
असा झाला दौरा
- जालना गेवराई बाजार, गोकुळवाडी (ता. बदनापूर), सोमठाणा प्रकल्पाची पाहणी (प्रकल्प सध्या कोरडा) त्यानंतर देऊळगावराजा रोडवरील गोंदेगाव, वाघ्रूळ जहांगीर या गावांना भेटी. पथकात कृषी संचालक के. व्ही. देशमुख, सहसंचालक जनार्दन जाधव, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, झेडपी सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांची उपस्थिती होती.
- बीड गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी, शिरूर कासार तालुक्यातील माताेरी, बीड तालुक्यातील चौसाळा येथे भेटी. या वेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पथकास जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, दुष्काळाच्या तीव्रतेची माहिती दिली.
- लातूर पथकाची जिल्ह्यातील बोरगाव (काळे) गावास भेट. या वेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, िवभागीय कृषी सहसंचालक के. एन. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांची उपस्थिती होती. सोमवारी रात्री लातूर मुक्कामी.
- उस्मानाबाद पाहणी पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील उपळाई शिवारातील पिकांची पाहणी केली. पथक मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका व परभणी जिल्ह्यातील परभणीसह गंगाखेड तालुक्यातील गावांची पाहणी करणार आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातही पाहणी करणार आहे.
मराठवाड्यात पुन्हा तीन शेतक-यांच्या आत्महत्या
दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे पथक आलेले असतानाच मराठवाड्यात पुन्हा तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्या तर एकाने जाळून घेतले. रामेश्वर जगदेवराव वाघमारे (३२, रा. गोजेगाव, ता. हदगाव), संदीप गुणवंत बुक्केवार (३०, रा. दुर्गापेठ पारडी, ता. किनवट, जि. नांदेड) आणि साहेबराव लक्ष्मण वैद्य (५५, रा. येवती, ता. उस्मानाबाद) अशी आत्महत्या केलेल्या शेतक-याची नावे आहेत. तर लक्ष्मण धारूजी नखाते (४५, पहाडी दहिफळ, जि. बीड) या शेतक-याने बुधवारी रात्री रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केस 0१
एक लाखाचे कर्ज, राहत्या घरी पेटवून घेतले
पहाडी दहिफळ येथील शेतकरी लक्ष्मण नखाते यांना अडीच एक्कर शेतजमीन असून चार वर्षांपूर्वी नखाते यांनी शेतीसाठी गावातील सोसायटीचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तीन वर्षांपासून सततची नापिकी,चा-याअभावी पशुधनाची होत असलेली होरपळ, अशा परिस्थितीत जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. याच निराशेत बुधवारी रात्री आठ वाजता राहत्या घरी त्यांनी पेटवून घेतले. हा प्रकार शेजा-यांना कळताच त्यांनी बचावाचा प्रयत्न केला. उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले आहे.
केस 02
मुलींच्या लग्नसाठी घेतले होते सावकाराकडून कर्ज
साहेबराव लक्ष्मण वैद्य (५५, रा. येवती) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन मुलींच्या लग्नाची देणी फेडण्यासाठी खासगी सावकरांकडून कर्ज काढले होते. तसेच त्यांनी कर्ज फेडण्यासाठी स्वत:जवळील सर्व मेंढ्यांची विक्रीही केली होती. तेव्हापासून ते हताश झाले होते. याप्रकरणी तलाठी विश्वास वायचळ यांनी पंचनामा केला. वैद्य यांच्या नावावर ०.७८ आर जमीन आहे. दरम्यान, केंद्रीय पथक येवती येथ्ून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या घोगरेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. याच वेळी येवती येथील शेतकरी वैद्य यांनी मृत्यूला कवटाळले. वैद्य यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, दोन मुली आहेत.
केस
03
नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी
हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील रामेश्वर जगदेवराव वाघमारे (३२) या तरुण शेतक-याने रविवारी सायंकाळी साडेचार वाजता नापिकीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अल्पभूधारक असलेल्या रामेश्वरने खरीप व रब्बी हंगामासाठी बँक व खासगी कर्ज घेतले. नापिकीमुळे हे कर्ज फेडणे शक्य नसल्याने त्याने आत्महत्या केली. त्याचा भाऊ ज्ञानेश्वर वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून हदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
केस
04
शेतात गळफास घेऊन मरणाला कवटाळले
किनवट तालुक्यातील दुर्गापेठ पारडी येथील रहिवासी असलेल्या संदीप गुणवंत बुक्केवार (३०) या तरुण शेतक-याने रविवारी रात्री १ वाजता हातोला शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीपची हातोला शिवारात ५ एकर शेती आहे. मराठवाडा ग्रामीण बँकेच्या उमरी बाजार शाखेकडून त्याने पीक कर्ज घेतले. नापिकीमुळे कर्ज फेडणे शक्य होणार नाही या भावनेने निराशेतच त्याने आत्महत्या केली. संदीपचे वडील गुणवंत बुक्केवार यांनी दिलेल्या माहितीवरून मांडवी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेत्यांच्या गराड्यात पथक हरवले
उस्मानाबाद
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी सोमवारी (िद. १५) जिल्ह्यात आलेले चार जणांचे केंद्रीय पथक नेते आणि अंधाराच्या गराड्यातच पाहणी करून पुढे गेले. यामुळे शेतक-यांतून नाराजी तर होतीच शिवाय यातून पदरात काय पडणार ? ही चिंता शेतक-यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती.

मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली असून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चा-याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या महिनाभरापासून या भागातील दुष्काळी परिस्थितीची प्रसार माध्यमातून मांडणी सुरू झाल्यानंतर सत्ताधा-यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वाहनांच्या ताफ्याच्या गराड्यात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा आटोपला. त्यानंतर याबाबत केंद्राकडे बोट दाखवण्यात आले आणि दरवेळीप्रमाणे केंद्रातील एक उच्चपदस्थ पथक दुष्काळी परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मराठवाड्यात दाखल झाले. औरंगाबादेतील बैठकीनंतर केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा, केंद्रीय विद्युत विभागाच्या संचालक वंदना सिंघल, केंद्रीय कृषी विभागाचे संशोधन अधिकारी व्यंकट नारायण अंन्जिना व केंद्रीय ग्रामविकास खात्याचे उपसचिव गुलझारीलाल असे चौघे जणांचे पथक सोमवारी पाहणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन गेले. दुपारी ३ वाजता उपळाई (ता. कळंब) येथे दाखल होणारे पथक सायंकाळी ५ वाजता दाखल झाले. त्यानंतर उपळाई येथे महामार्गालगत असलेल्या पुष्पसेन मंुडे यांच्या हरभरा पिकाची व खराडे या शेतक-याच्या चिंचेच्या फळबागेची पाहणी केली . या वेळी पथकाने परिस्थिती पाहून चिंता व्यक्त केली असली तरी उपळाईत नेत्यांच्या गराड्यामुळे शेतक-यांना पथकातील अधिका-यांशी थेट संपर्क साधता आला नाही. या वेळी नेतेमंडळीच एक, एक शेतकरी पुढे आणून पथकातील अधिका-यांसमोर उभे करत होते. यामुळेही अनेक शेतक-यांनी नाराजी व्यक्त् केली. त्यानंतर हे पथक घोगरेवाडी (ता. उस्मानाबाद) च्या दिशेने रवाना झाले. घोगरेवाडीत अंधार पडल्याने वाहनांची लाइट व छोट्या मिणमिणत्या बॅट-या याच्या प्रकाशात पथकाने काेरड्या तलावाची पाहणी केली. या वेळी मात्र शेतक-यांनी पथकासमोर व्यथा मांडल्या. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, सीईओ सुमन रावत, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आधार द्या...!
दुष्काळाने मोठं नुकसान झालंय. कसं जगावं कळत नाही, साहेब, जगण्यासाठी आधार द्या, अशी आर्त विनवणी कळंब तालुक्यातील उपळाई येथील शेतक-यांनी केंद्रीय पथकाकडे केली. जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे.

दोन तास प्रतीक्षा
केंद्रीय पथक ३ वाजेच्या सुमारास उपळाई येथे येणार होते. त्यामुळे २ वाजेपासूनच शेतकरी, नेते, पदाधिकारी, अधिकारी उपळाईत तळ ठोकून होते. परंतु प्रत्यक्षात हे पथक ५ वाजून १० मिनिटांनी दाखल झाले.