आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beating Case Happened In Parbhani Over The MLA Bhambale's Facilitate

आमदार विजय भांबळेंच्या सत्कारावरून हाणामारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिंतूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांचा सत्कार करण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी व दगडफेक होऊन यामध्ये पाच जण जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बामणी येथे मंगळवारी (दि.चार) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. या दरम्यान, एका गटाकडून पोलिस ठाण्यावरही तुफान दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांनी २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल केले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत विजय भांबळे निवडून आल्याबद्दल तालुक्यातील बामणी येथे एका समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी वाटप केलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर गावातील इतरांची नावे टाकली नव्हती वा त्यांना निमंत्रणेही दिली नव्हती. त्यामुळे दुखावलेल्या गावक-यांनी त्याचवेळेस गावातील महादेव मंदिरावर विजय भांबळे यांच्या सत्काराचे आयोजन ऐनवेळी केले. सकाळी अकराच्या सुमारास आ.भांबळे सत्कार स्वीकारण्यासाठी बामणी येथे पोहोचले. या वेळी सुरुवातीला आमचा सत्कार स्वीकारा, अशी मागणी दोन्ही गटाकडून करण्यात आली. त्यावर , भांबळे यांनी एका गटाची समजूत काढत प्रथम आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. कार्यक्रमादरम्यान, गावातील माजी उपसरपंच विलास देशमुख उपस्थित होते. या वेळी त्यांची कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. त्यात त्यांना मारहाण करण्यात आली. ही माहिती दुस-या गटातील लोकांना समजताच दोन्ही गट समोरासमोर आले. त्यानंतर दोन्ही गटांकडून अचानक तुफान दगडफेक झाली. आमदार भांबळे यांनी दोन्ही बाजूकडील आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. हा प्रकार दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होता. या वेळी काही कार्यकर्ते पोलिस ठाण्यातन बसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी दुस-या गटाने पोलिस ठाण्यावरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत ठाण्याच्या काचा व खिडक्यांचे नुकसान झाले. ही माहिती समजताच जिंतूर, बोरी येथील पोलिसांची जादा कुमक बामणीत दाखल झाली. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी पळ काढला. या दगडफेकीत पाच जण जखमी झाले असून चार जणांना जिंतूर येथे तर सुभाष रामलाल कुरील
यास परभणी येथे हलविण्यात आले.

गावात तणावपूर्ण शांतता
पोलिस ठाण्यावर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ३० जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस व राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.