आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरू, अजित पवारांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विधिमंडळाच्यायेत्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी लातुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. मराठवाड्यातील पक्षाच्या निमंत्रित कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे आदी उपस्थित होते. राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत पवार म्हणाले, निवडणूक काळात भाजपकडून देण्यात आलेल्या एकाही अश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही. शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरले आहे. उसाला जाहीर झालेली एफआरपीची रक्कम देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली दोन हजार कोटींची रक्कम साखर कारखान्यांकडे वळती करण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी संकटात आले आहेत.
काही भागात अद्याप पेरण्या झाल्या नाहीत, तर ज्या ठिकाणी पेरा झाला आहे तेथे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. परंतु सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने त्यांची या प्रश्नावर अनास्था दिसत असल्याचा आरोप पवार यांनी केला.येत्या अधिवेशनात सरकारला जागे करण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार पवारांनी बोलून दाखवला.

आता धारेवर धरू
राज्यातीलसरकारला सत्तेवर येऊन आठ महिन्यांचा कालावधी होत आला आहे. परिणामी त्यांना जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील. त्यासाठी आम्ही रस्त्यावर आणि सभागृहात सरकारला धारेवर धरू, असा इशाराही अजित पवार यांनी या वेळी दिला.