आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ अपघातातील मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक ठार झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड मार्गावर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अपघातातील चारही मृत भाविक वणी (जि. नाशिक) येथील असून त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

वणी येथील सप्तशृंगीगड निवासिनी ट्रस्टचे विश्वस्त संजय थोरात यांच्यासह शिवाजी थोरात, गणेश थोरात, साहेबराव देशमुख हे कारने (एमएच 15-डीबी 9461) तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी शनिवारी रात्री निघाले होते. आष्टी तालुक्यातील कड्याजवळ नगर-बीड मार्गावरील हॉटेल अमर पॅलेसजवळ कार आली तेव्हा मालवाहू ट्रकने (एमएच 04-1205) कारला जोराची धडक दिली.

कार ट्रकच्या खालील बाजूने आत घुसल्याने तीन जण जागीच ठार झाले. सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, सरपंच रमजान तांबोळी, संपत कर्डिले, सहायक पोलिस निरीक्षक शेख, हवालदार किशन वळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेले साहेबराव देशमुख यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. या ठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

चालक फरार
नगर-बीड मार्गावरील अपघातानंतर मालवाहू ट्रक चालक गाडी सोडून फरार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. चालकाचा शोध घेतला जात असून दरम्यान चारही भाविकांच्या मृतदेहाची रविवारी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.’’ - एस. एस. डोके, पोलिस निरीक्षक, आष्टी.