बीड - लोकसभा निवडणुकीत भाजप जिल्ह्यात ग्रेड वनमध्ये असल्याने मोदींची वा अन्य राष्ट्रीय नेत्यांची सभा घेण्याची गरजच भासली नाही! मात्र, निवडणुकीनंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले आणि पोटनिवडणूक, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ थेट पंतप्रधान मोदींना येण्याची वेळ आली. शनिवारी पंतप्रधानांची बीडमध्ये जाहीर सभा होणार असून ते काय बोलतात, याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने काँग्रेस व अन्य पक्ष जमीनदोस्त केले. काँग्रेस, राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. यात बीड जिल्ह्यात मुंडेंचे अस्तित्व आणि मोदी लाटेमुळे राज्यमंत्री सुरेश धस यांना पराभव पत्करावा लागला. आता लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ पंतप्रधान
नरेंद्र मोदी बीडपासून करणार आहेत. मोदी काय बोलतात, याकडे सामान्य मतदारांच्या नजरा लागल्या आहेत. कोणती आश्वासने मिळणार, याविषयी उत्सुकता मतदारांना आहे. मोदींच्या प्रचारसभेविषयी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार अशोक पाटील म्हणाले, भाजपकडे शिवसेना हा केडर बेस पक्ष होता, परंतु आता भाजपला ग्रामीण भागात मतांचे स्थान नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड जिल्ह्यात येत आहेत. त्यांनी व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वच पातळ्यांवर धाेरणात्मक बदल करावे, असे महाराष्ट्र कृषी विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी सांगितले.