आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा लाख रुपये खचरूनही सिग्नल मृतावस्थेतच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी नगर परिषद व पोलिस दलाकडून 15 लाख रुपये खचरून शहरातील मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी बसविण्यात आलेले सिग्नल अजूनही बंदच आहेत. पावसाळ्यात नालीचे खोदकाम करताना जेसीबीने तुटलेले वायर दुरुस्त करण्यासाठी 80 हजारांचा खर्च येणार असल्याने सिग्नलचे भिजत घोंगडे कायम आहे. अपघाताच्या घटनेनंतर सिग्नलचा प्रन पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी 1998 मध्ये पोलिस दलाच्या वतीने नगर परिषदेला दहा लाखांचा निधी देण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी चौक, साठे चौक, बसस्थानक या भागात सिग्नल बसविण्यात आले. सिग्नल बसविल्यानंतर शहरातील वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र वर्षाच्या आतच देखभाली अभाव सिग्नल बंद पडले. पुन्हा याकडे कोणीच लक्ष न दिल्याने धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग शहरातूनच जात असल्याने या महामार्गावर जड वाहनांची गर्दी असते. सिग्नल बंद असल्याने वाहतुकीच्या कोंडीत वाढ झाली. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या बीडच्या दौर्‍यावर येणार असल्याने वर्षभरापूर्वी नगर परिषदेकडून पाच लाख खर्च करून सिग्नलची दुरुस्ती करण्यात आली. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सिग्नल चोवीस तास सुरू राहावेत यासाठी इन्व्हर्टर बसविण्यात आले होते. साठे चौकात दोन पोल उभारण्यात आले. राष्ट्रपतींच्या दौर्‍यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. पावसाळ्यात चार महिन्यांपूर्वी नाल्यांतील गाळ जेसीबीने काढत असताना अंडरग्राऊंड असलेले सिग्नलचे वायर तुटल्याने सिग्नल बंद झाले. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. या दुरुस्तीसाठी 80 हजारांचा खर्च येणार आहे. सिग्नलच्या देखभालीसाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे नगर परिषदेकडून चाव्या देण्यात आल्या आहेत. सिग्नलचे भिजत घोंगडे चौदा वर्षांपासून कायम आहे. कधी डिजिटल बॅनर तर कधी अंडरग्राऊंड असलेले वायर तुटत असल्याने सिग्नल बंद पडत आहेत.