आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: मातेने नवजात बालिकेला अव्हेरले, जिल्हाधिकारी दत्तक घेऊन देणार आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - माणुसकी रक्तातच असते. घटना घडतात तेव्हा ती आपोआप पाझरते. त्याला मग नात्याची, जातीची बंधने आडवी येत नाहीत. ही माणुसकी अनेकदा इतरांसाठी आदर्श ठरते. बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही मातेने अव्हेरलेल्या एका एक महिन्याच्या बालिकेला दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन असाच एक आदर्श नुकताच घालून दिला.

सध्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणूक आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीची धूम आहे. प्रशासन प्रचंड व्यग्र आहे. या घाईत पोलिस वसाहतीच्या आवारात एक अज्ञात माता बालिकेला टाकून पसार झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी बाळास तातडीने रुग्णालयात हलवून उपचार सुरू केले. आता मातेने अव्हेरलेल्या या चिमुकलीला निवडणूक आटोपताच जिल्हाधिकारी दत्तक घेणार आहेत.

स्त्री भ्रूणहत्या, मुलींचा घसरत चाललेला जन्मदर, अफूच, गांजाची शेती आणि राजकीय घटनांमुळे बीड जिल्हा राज्यातच नव्हे, देशात चर्चेत असतो. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि महाराष्ट्रातील बिहार अशी ओळख पुसून बीडचे नाव उज्ज्वल करण्याची उमेद असलेले चांगले अधिकारीही या जिल्ह्याला लाभले. यात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचेही नाव जोडले गेले.

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयामागील पोलिस वसाहतीच्या आवारात महिनाभरापूर्वी जन्मलेल्या बालिकेला सोडून माता निघून गेल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांना मिळाली. तोवर पोलिसांनी या बालिकेला जिल्हा रुग्णालयात हलवले होते. हे समजताच जिल्हाधिका-यांनी निवडणुकीच्या व्यवस्थेतून मुद्दाम वेळ काढून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना सूचना दिल्या आणि शनिवारी सकाळीच जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहोचले. निरागस, कोमल चिमुरडीला पाहून त्यांचेही मन हेलावले आणि त्याच क्षणी त्यांनी कलेक्टर कचेरीत महिला व बालकल्याण विभागाच्या अधिका-यांची बैठक बोलावली. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने काहीही ठोस निर्णय सांगता येणार नाही. या बाळाच्या प्रकृती सुधारण्यावर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नंतर निर्णय घेण्यात येईल, असे राम यांनी सांगितले.