आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहराज्यमंत्री शिंदेंना चोरट्यांची सलामी, तोळे सोने लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे बुधवारी बीड दौऱ्यावर असतानाच शहरातील सारडानगरी येथे सकाळी सव्वादहा वाजता संतोष कुमार बजाज यांचे घर फोडून चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लांबवला. तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र कायम आहे.

दोन दिवसांपूर्वीच शहरातील मोंढा भागात जगदीश चरखा प्रेमचंद संचेती यांची लुटमार केल्याची घटना ताजी असतानाच शहरातील सारडानगरी येथील रहिवासी संतोषकुमार विष्णुदास बजाज यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ केले. बजाज यांच्या पत्नी ज्याेती बुधवारी सकाळी दहा वाजता भाजीमंडईत गेल्या होत्या. ही संधी साधून भाजी खरेदी करताना चोरट्यांनी धक्का देत त्यांच्याकडील पर्स हिसकावली. पर्समधील घराची चावी, सहाशे रुपये घेवून चोरट्यांनी सारडानगरी गाठली. बजाज यांचे घर उघडून आठ तोळे सोने रोख रक्कम असा लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर दुपारी सारडानगरीत श्वानपथक पोहोचले. मात्र, श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. श्वान सारडानगरीत घुटमळत राहिले.

गॅस सुरू करून चोरटे पसार, अनर्थ टळला
संतोषबजाज यांच्या घरात घुसलेल्या चोरांनी चोरी केल्यांनतर परत जाताना घराचे सर्व दरवाजे, खिडक्या बंद केल्या. गॅस सुरू करत लायटर मात्र घराबाहेर फेकून दिले. घराची कडी बंद करून चोर पसार झाले. काही वेळातच भाजीमंडईतून ज्योती बजाज घरी पोहोचल्या. त्यांना दरवाजास कुलूप दिसलेच नाही. दार उघडून पाहिले असता सर्व खिडक्या बंद होत्या अन् घरात सर्वत्र गॅस पसरला होता. विशेष म्हणजे चोरांनी फ्रिजही बंद केले होते. बजाज यांनी फ्रिज सुरू केला असता तर स्पार्किंग होऊन गॅसचा स्फोट झाला असता, परंतु सुदैवाने अनर्थ टळला.