आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडे, आ. पंडित यांना फरार घोषित करा, एसआयटीचा कोर्टात अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड‍- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटप घोटाळा प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित, भाजप नेते रमेश पोकळे यांच्यासह १११ जणांना फरार घोषित करण्याची विनंती विशेष तपास पथकाने सोमवारी न्यायालयात केली.

विशेष तपास पथकाने सोमवारी न्यायालयात अंतिम तपास अहवाल सादर केला. तीन प्रकरणांमध्ये आणखी ५९ जणांना अारोपी करण्यात आले आहे. मूळ आणि नवीन असे १११ आरोपी सध्या पोलिसांच्या दृष्टीने फरारच आहेत. त्यांना अधिकृत फरार घोषित करण्याची विनंती विनंती केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्य व बोगस कर्ज वाटप प्रकरणात १३१ प्रकरणांत गुन्हे नोंद होते. त्यांचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने ऑगस्ट २०१५ मध्ये विशेष तपास पथक स्थापले होते. या पथकाने आठवडाभरापूर्वी १०१ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. तेव्हा अटकेच्या भीतीने माजी संचालक व लाभधारक संस्थांचे संचालक फरार होते. मात्र,अटक होत नसल्याचे पाहून ८५ जणांनी एसआयटीसमोर हजेरी लावली होती.
अंतिम अहवाल न्यायालयात जाण्यापूर्वी या सर्वांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र कुणीच हजर न राहिल्याने रविवारी पोलिसांनी अटकसत्र करण्याचा प्रयत्न करत विविध पथकांना ठिकठिकाणी पाठवले. परंतु, सकाळीच सर्व आरोपी फरार झाल्याने पोलिस कुणालाच अटक करू शकले नव्हते. त्यामुळे सोमवारी पोलिसांनी बीड व परळी न्यायालयात अहवाल सादर केले अाहेत.
... तर दिसतील तेथे अटक
पोलिसांनी कोर्टात सर्व १११ आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २९९ नुसार आरोपी म्हणून अहवाल दिला. ८२व्या कलमानुसार या सर्वांना फरार घोषित करण्यासाठी कोर्टाला विनंतीही केली आहे. कोर्टाच्या निर्णयावर पुढील कारवाई होईल. ते सध्या पोलिसांच्या दृष्टीने फरारच आहेत. कोर्टानेही त्यांना अधिकृतपणे फरार घोषित केल्यास धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, रजनी पाटील फरार असतील. दिसतील तिथून त्यांना अटक करण्यात येईल.
७ गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र
सात गुन्ह्यांमध्ये कर्ज वाटप करताना नियमाचे उल्लंघन केल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले असून त्यानुसार सात गुन्ह्यांत पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक

पुढील स्लाइडवर वाचा, गोपीनाथ मुंडे यांच्या सोलापूर येथील डेंटल हॉस्पिटलने भरली कर्जाची रक्कम...
बातम्या आणखी आहेत...