आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, जालन्याच्या बाजरीची पुन्हा सौदी अरेबियावर स्वारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मराठवाड्यातील बाजरीने सौदी अरबस्तानात स्वारी केली आहे. मेमध्ये 290 टन बाजरीच्या निर्यातीनंतर पुन्हा बीडमधून 288 टन बाजरीची निर्यात झाल्याने शेतक-यांना चांगला भाव त्याचबरोबर व्यापा-यांनी प्रयत्न केले तर चांगला लाभ मिळण्याच्या दृष्टीने आशेचा किरण मानला जात आहे. मे ते जूनदरम्यान बीड येथून एकूण 578 टन बाजरीची निर्यात सौदी अरबस्तानात झाली आहे.


बीड जिल्ह्यातील बाजरीचे वाण चांगले असते. चांगल्या दर्जामुळे राजस्थान व गुजरातमध्ये बाजरीला अनेक वेळा चांगली मागणी राहिली आहे. आपला माल केवळ स्थानिक बाजारातच न विकता शेजारी राज्यांसोबतच अन्य देशांत विकण्यासाठी येथील व्यापारी प्रयत्न करत आहेत. येथील आडत व्यापारी विष्णुदास बियाणी यांनी एप्रिल-मेमध्ये 290 टन बाजरीची निर्यात केली होती. या बाजरीला चांगली मागणी लक्षात घेऊन बियाणी यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्याला यश आले.


बीडसह जिल्ह्यातील परळी, गेवराई, माजलगाव, धारूर तसेच जालना व अंबड तालुक्यातून 1375 ते 1400 रुपयांपर्यंत भाव देऊन बाजरीची खरेदी केली. त्यासाठी हमाली व वाहतुकीचा खर्च बियाणी यांनी केला. खरेदी केलेल्या बाजरीची क्लीनिंग करण्यात आली. साफ केलेली बाजरी 15 किलो पॅकिंगमध्ये भरण्यात आली.


या पिशव्यांवर अरबी व इंग्रजी भाषेतून ‘ग्रीन मिलेट’ असा उल्लेख करण्यात आला. निर्यातदारांकडून पुरेसे सहकार्य मिळाले. या सर्व प्रक्रिया केलेल्या बाजरीला 1525 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 15 ते 29 जूनदरम्यान ही बाजरी कंटेनरपर्यंत पोहोचली. निर्यातदाराला ठरलेल्या तारखेआधीच बाजरीची शिपमेंट डिलिव्हरी करण्यात आली. ही बाजरी सौदी अरबस्तानात पोहोचली आहे. व्यापा-यांनी प्रयत्न केले तर चांगला लाभ मिळण्याच्या दृष्टीने आशेचा किरण मानला जात आहे. मे ते जूनदरम्यान एकूण 578 टन बाजरीची निर्यात झाली.


प्रगती होत राहावी
बीड जिल्ह्यातील शेतकरी आधुनिकतेची कास धरून शेती करू लागले आहेत. चांगले व दर्जेदार उत्पादन घेतल्याने बाजरीला मागणी आली. ती सौदीपर्यंत पोहोचली ही चांगली बाब आहे. शेतक-यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेऊन प्रगती साधावी.
अरुण डाके, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड.


दर्जा राखला
सौदीमध्ये कॅटलफीडसाठी साधारण बाजरी, तर उच्च प्रतीची बाजरी खाण्यासाठी वापरली जाते. मेमध्ये 290 टन बाजरीची निर्यात केल्यानंतर पुन्हा प्रयत्न केले. निर्यातदाराशी सौदा जमला आणि जूनमध्ये 288 टन बाजरीची निर्यात केली आहे. दर्जा राखण्याइतपत स्वच्छता व उपाय करावे लागतात. मराठवाड्यातील बाजरीने सौदीपर्यंत मजल मारल्याने समाधान वाटते. विष्णुदास बियाणी, आडत व्यापारी, बीड.