आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी: राजीनामा अन् खुनाची; जिल्हा परिषदेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा परिषदेतील गैरव्यवहाराचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतरही राजरोसपणे अनधिकृत कामांचा वेग सुरू असतानाच आता अध्यक्ष आणि अधिका-यांमधील कलगीतुरा रंगला! सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिका-यांना धक्काबुक्की करत खुनाची धमकी देणारे जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे धाव घेत राजीनाम्याची धमकी दिली.

दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी सावध भूमिका घेत या प्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना भेटून तोडगा काढणार असल्याचे सांगितले. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपायुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून अधिका-यांना सूचना देत होते. एवढ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुला आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर.भारती यांच्यात स्थायी समितीचे इतिवृत्त पूर्ण झाले नसताना स्वाक्षरी करण्यावरून वाद सुरू झाला. दोघेही हमरीतुमरीवर आले. मुद्द्यावरून गुद्द्यांवर येत अब्दुल्ला यांनी भारती यांना शिवीगाळ करत खुनाची धमकी दिली.

यावर भारती यांनी थेट पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना भेटून तक्रार देत अध्यक्ष अब्दुला यांच्यावर गुन्हा नोंदवून पोलिस संरक्षणाची मागणी केली. यावर रेड्डी यांनी शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राधाकृष्ण चाटे यांना बोलावून भारती यांची तक्रार नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर भारती यांनी पोलिस ठाणे गाठले. चाटे यांच्या हाती तक्रार दिली. त्यानुसार अब्दुल्लांविरोधात गुन्हा दाखल झाला.

भारतींना रडू कोसळले
जिल्हा परिषद अध्यक्षांनी केलेली धक्काबुक्की त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यास करण्यात आलेली टाळाटाळ व यापूर्वी अध्यक्ष अब्दुला यांनी पाच वेळेस गाडी अडवून केलेली दमदाटी या कारणावरून अस्वस्थ झालेल्या भारती यांना सीईओ जवळेकर यांच्याशी बोलताना रडूच कोसळले. साहेब तुम्हीसुद्धा पदाधिका-यांच्या त्रासामुळे कार्यालयात येत नाहीत. पदाधिकारी अधिका-यांना अशी दादागिरी करतात त्यामुळे अधिकारी कार्यालयात थांबत नाहीत, अशी त्यांनी कैफियत मांडली.

मला अध्यक्ष राहायचे नाही
सीईओ राजीव जवळेकर यांच्या कक्षातून आर.आर.भारती संतापाने निघून गेल्यानंतर लगेचच अध्यक्ष अब्दुला यांनी कक्षात प्रवेश केला. साहेब मला आता जिल्हा परिषद अध्यक्ष राहायचेच नाही. मला राजीनामा लिहून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सादर करायचा आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय दौंड यांच्यासह इतर सदस्यांनी अब्दुला यांना सीईओंच्या दालनातील आतील खोलीत नेऊन त्यांची समजूत काढली. दरम्यान सीईओ जवळेकर यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना माहिती देणार असल्याचे सांगितले.

बिहारपेक्षा जास्त दादागिरी
जिल्हा परिषदेत घेण्यात आलेले ठराव, झालेली कामे याची उच्च्स्तरीय चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारे दादागिरी करणे म्हणजे ही बोगस कामाची लक्षणे आहेत. इथे बिहारपेक्षा जास्त दादागिरी आहे. खोट्या झेडपीआरच्या स्वाक्ष-या घेण्यासाठी यापूर्वी माझी दोनवेळा नायगावला शेतात अध्यक्ष अब्दुला यांनी गाडी अडवत स्वाक्ष-या घेतलेल्या आहेत.सीईओंनी शेवटी झेडपीआरची कामेच रद्द केली. झालेल्या बोगस कामाची चौकशी व्हावी.’’ आर.आर.भारती ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

शिपायांना पदस्थापना कशी ?
मी यापूर्वी ‘झेडपीआर’ची फाइल घेऊन कधीच मुख्य कार्यकरी अधिका-यांकडे गेलो नाही.भारती यांनी अनुकंपावरील तीन शिपायांना सरळसेवेने वरिष्ठ अधिकारी लेखा म्हणून पदस्थापना कशी दिली,ते सांगावे. एक तर भारती यांना रिलिव्ह करावे, नाहीतर मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही.’’ सय्यद अब्दुला, अध्यक्ष जिल्हा परिषद

पोलिस संरक्षण दिले
जिल्हाधिकारी कार्यालयात धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर.भारती यांनी मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास अध्यक्ष सय्यद अब्दुला यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे मला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. दुपारी शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. रात्री आठ वाजता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.