बीड - जिल्हा परिषदेत तेरावा वित्त आयोग आणि झेडपीआरच्या निधीत चाळीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. अन्यथा स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्यास रोखण्यात येईल, त्यावरही ते गेल्यास आत्मदहन करण्याचा इशारा भाजपच्या पदाधिका-यांनी दिला आहे.
या संदर्भात सोमवारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आर.टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, जिल्हा परिषदेचे गटनेते मदत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे, सुरेश उगलमुगले, सुभाष धस, कल्याण आखाडे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत 13 व्या वित्त आयोगात व झेडपीआरमध्ये भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. नियमाप्रमाणे सर्वसाधारण सभेत 13 व्या वित्त आयोगाच्या व झेडपीआर निधीच्या खर्चाला मान्यता दिली जाते. मात्र सर्वसाधारण सभेत कोणताही विषय चर्चेला आला नसताना जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनीच परस्पर सदस्यांची यादी तयार केली. कामांना दिलेली प्रशासकीय मान्यताही खोटी असून यावरच कार्यारंभ आदेश देण्यात आले. 2013 - 14 या वर्षासाठी 6 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र याच्या दीडपट म्हणजे तब्बल 10 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. अशाच प्रकारे 40 कोटींच्या कामांनाही मान्यता दिल्या असून 15 कोटींची बिलेही काढण्यात आल्याची तक्रार केली. यानंतर जिल्हाधिका-यांनी याची दखल घेत शनिवारी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत सोमवारी सादर करण्याचे आदेश अधिका-यांना देऊनही माहिती उपलब्ध होत नसल्याने भाजपाकडून मंगळवारपासून उपोषण करण्यात येईल, 15 ऑगस्टपर्यंत भ्रष्टाचार करणा-याविरुद्ध गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
तपासणीनंतर कारवाई - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना प्रोसिडिंग आणि ठराव देण्याचे आदेश दिले आहेत. त्याची तपासणी केली जाईल. यात चुका आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाईल. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी.