आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड पालिकेचा अर्थसंकल्प: करवाढीस ब्रेक; सुविधा सुसाट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या लेखानुदानाप्रमाणेच अर्थसंकल्प तयार करताना पालिकेने अनेक नागरी सुविधा पुरवण्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. व्यापार, रोजगार, क्रीडांगणे, गार्डन, फिश मार्केट आदी सुविधा पुरवण्याचा संकल्पही सोडला. मात्र, त्यासाठी निधी उभारताना नागरिकांवर करवाढ लादणे शिताफीने टाळले आहे. 2014-2015 या वर्षांत 75 कोटी 71 लाख 55 हजार खर्च होऊन पालिकेच्या तिजोरीत किमान 11 लाख 14 हजार 123 रुपये शिल्लक राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अंदाजपत्रकाची माहिती देण्यासाठी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालिका गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, उपाध्यक्ष शेख शाकेर, उपमुख्याधिकारी अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. 2012-2013 या वर्षात पालिकेला पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत या मूलभूत सुविधा पुरवताना 3.92 कोटींची तूट आली. ती इतर उत्पन्नातून भागवण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांच्या वेतनफरकाचा निधी मिळणे बाकी असताना स्वनिधीतून 227.97 लाखांचा खर्च केला, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.


हे मिळणार : शहर स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी अद्ययावत यंत्रणा, दोन स्वतंत्र क्रीडांगणे उभारणे, महिला, युवतींसाठी क्रीडांगणे काही दिवस आरक्षित ठेवणे, चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन सुसज्य उद्याने.
या घोषणांचा विसर : सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी जागा, खतनिर्मिती, सिग्नलजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न असे अनेक विषय बासनात आहेत. दरम्यान, वीज बिलासाठी स्वनिधीतून रक्कम उभारण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.


चार नवी आरोग्य केंद्रे
बीड शहराची वाढलेली हद्द यामुळे लोकसंख्येनुसार सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार शहराच्या चार ठिकाणी पालिकेद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा केंदे उभारण्यात येणार आहेत. यात धानोरा रोड, शहेनशा हवेली, मोमीनपुरा, शाहूनगर या भागांचा समावेश असणार आहे.

बीड पालिकेच्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर व अन्य अधिकारी.

शहर विकासाला प्राधान्य
शहराची हद्दवाढ, अपुरे मनुष्यबळ, वेतनातील प्रलंबित फरक, पालिकेवरील अतिरिक्त बोजा असूनही मूलभूत सुविधा पुरवण्यासह विकासात्मक योजनाची जोड देण्याचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पात विस्तारीकरणातील पायाभूत सुविधांसह सुशोभीकरण, महिला-युवक विकास व अन्य बाबींना प्राधान्य आहे.’ डॉ. भारतभूषण क्षीरसागर, गटनेते, पालिका


पालिकेची यशस्वी वाटचाल
पालिका आणि नागरिकांमधील अतूट नाते कायम राहण्यासाठी महिला दरबार उपक्रम सुरू आहे. त्याद्वारे नागरिकांना छोट्या-छोट्या सुविधा तत्काळ देणे शक्य झाले. या अर्थसंकल्पात करवाढ नाही. पालकमंत्री आणि गटनेते यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेची वाटचाल सुरू आहे.’ डॉ. दीपा क्षीरसागर, नगराध्यक्षा