आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूच्या टिप्परने चिरडल्याने दोघांचा मृत्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/माजलगाव - वाळूची वाहतूक करणा-या टिप्परने जेसीबीलगत झोपलेल्या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी रात्री एकच्या सुमारास हिवरा बु. (ता. माजलगाव) येथे घडली. प्रशासनासह वाळू ठेकेदारांविरुद्ध संताप व्यक्त करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थ व कुटुंबीयांनी सोमवारी घेतला. दरम्यान, जिल्हाधिका-यांनी तत्काळ तलाठ्यासह मंडळ अधिका-यास निलंबित करत माजलगाव गोदाकाठच्या वाळू उपशावर बंदीचे आदेश दिले.


तालुक्यातील हिवरा बु. येथील वाळूच्या ठेक्यावर रात्री एकच्या दरम्यान जेसीबीच्या बाजूस झोपलेल्या दोन जणांना टिप्परने (एमएच 12-178) चिरडले. त्यात परमेश्वर ज्ञानोबा गाडे (17), पोकलेन ऑपरेटर (नाव समजले नाही) हे दोघे ठार झाले. सकाळी सात वाजेच्या दरम्यान परमेश्वर रात्री घरी का परतला नाही म्हणून त्याचा भाऊ नितीन पाहण्यासाठी गेला असता त्यास घटनास्थळी अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्याने परिसरातील लोकांना एकत्र केले. अपघातानंतर चालक व अन्य टिप्पर सोडून फरार झाले होते.


घटनास्थळी तहसीलदार किरण आंबेकर, पोलिस निरीक्षक ओ.डी. माने, पोलिस उपअधीक्षक ज्योती क्षीरसागर यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने तसेच कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेत नसल्याने बीड येथून अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे घटनास्थळी दाखल झाले. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात ठार झालेल्या गाडेचे वडील जखमी झाले. जिल्हाधिका-यांनी ठेकेदार सय्यद जाकेर, वाहनचालक, जेसीबीचालक व अन्य दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.


ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यासाठी पत्र
माजलगाव गोदाकाठच्या परिसरात जालना येथील ठेकेदार वाळू उपसा करतात. या प्रकरणात दोषी असणा-या ठेकेदाराची चौकशी करून परवाना रद्द करण्याचे पत्र जालना जिल्हाधिका-यांना दिल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दै.‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.