आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed News In Marathi, Gopinath Munde, Suresh Dhas, Lok Sabha Election

निवडणुकीचा आखाडा: बीडला मुंडे - धस सामना रंगणार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ‘माझ्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार मिळेना.. माझा भिडू कोण? हे मीच ठरवणार! ’ भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अशा घोषणा सुरू असतानाच, राष्ट्रवादीत मात्र पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर की राज्यमंत्री सुरेश धस असा खल सुरू असल्याने मतदारसंघात कमालीचे औत्सुक्य होते. अखेर सोमवारी धस यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली.

राजकारणातील खाचखळगे ज्यांच्या बोटाला धरून शिकले, जिल्हा परिषदेपासून विधान भवनात प्रवेश केला ते एकेकाळचे राजकीय गुरू असलेल्या मुंडेंविरुद्ध राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार म्हणून आता राज्यमंत्री सुरेश धस मैदानात उतरले आहेत.
गोपीनाथ मुंडे मागील निवडणुकीच्या वेळी प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्या वेळी मुंडेंविरोधात राष्ट्रवादीने रमेश आडसकर यांच्या रूपाने कोरी पाटी समोर आणली. मुंडेंच्या गटात त्या वेळी गेवराईचे अमरसिंह पंडित, पुतण्या धनंजय मुंडे अशी तोफ होती. याशिवाय पुढे सहाच महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने संधी साधून मुंडेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना गोंजारून, विधानसभेला मदतीचे आश्वासन देत त्यांच्यात फूट पाडली. परळी वगळता पाचही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीची सत्ता असूनही मुंडेंनी सर्वच मतदारसंघांतून आघाडी मिळवत एक लाख चाळीस हजारांचे घसघशीत मताधिक्य मिळवले होते. मात्र मागील पाच वर्षांत जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर राजकीय बदल झाले. भाऊ पंडितराव, पुतण्या धनंजय, अमरसिंह पंडित मुंडेंची साथ सोडून राष्ट्रवादीत गेले. परळी वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे यंदा तर मुंडेंना पराभूत करण्याचा चंगच राष्ट्रवादीने बांधला आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मैदानात उतरविण्याचे सर्वपातळीवर प्रयत्न झाले. शरद पवार, अजित पवार यांनीदेखील क्षीरसागरांनाच गळ घातली; परंतु त्यांनी सुरुवातीला नम्रपणे आणि नंतर जास्तच आग्रह सुरू झाल्याने कठोर होत निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यासाठी स्वपक्षीयांवरच विश्वास नसल्याचे कारणही दिले. परिणामी मागील दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीचा वेळ उमेदवार ठरविण्यातच गेला. तर दुसरीकडे, मुंडेंनी गावोगावी प्रचार सभा घेण्यावर भर दिला. अखेर हो-ना करत सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्यमंत्री सुरेश धस यांचे नाव पक्षाने जाहीर केले आणि अटीतटीची निवडणूक होणार, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.


गुरू-शिष्य आमने-सामने
जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आलेले सुरेश धस भाजपत आले आणि पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मुंडेंना राजकीय गुरू मानणारे धस 2002 मध्ये अजित पवारांच्या पक्षात डेरेदाखल झाले; परंतु मुंडेंशी असलेले सख्य कमी होऊ दिले नाही. आता पक्षादेश शिरसावंद्य मानून ते गुरूविरुद्ध लोकसभेसाठी शड्ड ठोकून सज्ज झाले आहेत.