आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed Politics News In Marathi, Gopinath Munde, Suresh Dhas, Lok Sabha Election

बीडच्या लढतीकडे राज्याचे लक्ष, मुंडे आणि धस यांच्यात दुरंगी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून मराठवाड्यातील निम्म्यापेक्षा अधिक उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. केवळ बीडमध्ये चित्र स्पष्ट असून भाजपचे विद्ममान खासदार गोपीनाथ मुंडे आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री सुरेश धस यांच्या दुरंगी लढतीकडे सबंध महाराष्‍ट्राचे लक्ष लागून आहे. आपनेही जालना आणि बीडमधून उमेदवार उभे केले असून अन्य जिल्ह्यांत त्यांना उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र आहे.


बीड - भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध लढत असलेले राज्यमंत्री सुरेश धस यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते संपूर्ण ताकद उभी करणार असून सर्व शक्तीने लढा देणार आहेत. त्यामुळे मुंडेंना सोपी वाटणारी लढत हे नेते राज्यातच नव्हे, तर देशभरात लक्षवेधी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंडेंच्या पठडीत तयार झालेले आणि त्यांच्या पुढे एक घर पाऊल टाकून यशस्वी राजकारण करणारे धस मुंडेंसाठी खरोखरच एक आव्हान ठरू पाहत आहेत. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणूक लढवणार नसतील तर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्या, जिल्हाभर फिरण्यासाठी वाव द्या, मी मुंडेंविरोधात रणशिंग फुंकतो, अशी तयारी राज्यमंत्रिपद मिळतानाच सुरेश धस यांनी श्रेष्ठींकडे आठ महिन्यांपूर्वीच दाखवली होती; परंतु क्षीरसागरांना आता दुखावल्यास त्याचा पक्षाला चांगला फटका बसू शकेल, हे ओळखून पक्षनेतृत्वाने हे पाऊल उचलले नव्हते.


नांदेडमध्ये भाजपचा अपवाद वगळता अन्य उमेदवारांची प्रतीक्षा
नांदेड २भाजपने माजी खासदार डी. बी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 2004-2009 या कालावधीत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. काँग्रेसच्या गोटात विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पालकमंत्री डी. पी. सावंत यांची नावे चर्चेत आहेत. शेतकरी संघटना व आम आदमी पार्टीत युती झाली आहे. चंद्रपूर मतदारसंघात वामनराव चटप यांना आम आदमी पार्टीने उमेदवारी दिली आहे.


हिंगोलीत बसपा, मनसेची भूमिका निर्णायक
हिंगोली २ आगामी निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून मनसे आणि बसपाच्या उमेदवारांनी मिळवलेली मते निर्णायक भूमिका बजावणार आहेत. काँग्रेससाठी वातावरण पोषक आहे. याच कारणामुळे कळमनुरीचे आमदार राजीव सातव यांनी थेट राहुल गांधींशी चर्चा करून राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा सोडवून घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नात आहेत.


काँग्रेसचे तळ्यात-मळ्यात
जालना २ भाजपतर्फे खासदार रावसाहेब दानवे यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे कुंजबिहारी अग्रवालही मैदानात उतरले आहेत. त्यांनीसुद्धा जोरदार फील्डिंग लावली आहे. दरम्यान, काँगे्रस आणि मनसेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.


काका-पुतण्यात सामना?
उस्मानाबाद २ राष्‍ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महायुतीचे घोडे अडले आहे. एकंदर स्थिती पाहता मतदारसंघात आघाडी विरुद्ध महायुतीच्या उमेदवारांमध्ये सामना होऊ शकतो. महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख प्रा. रवींद्र गायकवाड आणि उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. ओमराजे यांना उमेदवारी मिळाल्यास काका-पुतण्याचा सामना रंगू शकतो.


लातूरमध्‍ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मुख्य पक्षांचे उमेदवारच घोषित झालेले नाहीत. राहुल गांधींच्या कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडून द्यायच्या प्रक्रियेत काँग्रेस पक्ष गुंतला आहे, तर अंतर्गत गटबाजीमुळे कोणता उमेदवार द्यायचा, असा प्रश्न भाजपसमोर आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ मागील वेळेपासून राखीव झाला आहे. मागील वेळी विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जयवंत आवळे यांना लातूरला पाठवण्यात आले होते.


परभणीमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसने विजय भांबळे यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेने मात्र विद्यमान खासदार गणेश दुधगावकर यांना घरचा रस्ता दाखवला असून आमदार बंडू जाधव यांच्या गळयात माळ टाकली आहे. राष्‍ट्रवादी-शिवसेना अशा दुरंगी लढतीचे चित्र सध्या आहे.


आपचा उमेदवार उच्चशिक्षित : दिल्लीत अनपेक्षित यश मिळवून सबंध देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या आम आदमी पार्टीनेही जालन्यातून उच्चशिक्षित व अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दिलीप म्हस्के यांना, तर बीडमधूनही सिनेअभिनेता नंदू माधव यांना संधी दिली आहे. लातूर, नांदेडमध्ये तर ‘आप’ला उमेदवारही मिळेनासे झाले आहे.
हिंगोली, उस्मानाबादेत तिसरी आघाडी : तिसरी आघाडी नांदेडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक नाही. हिंगोली (पांडुरंग देसाई) व उस्मानाबाद (अ‍ॅड. रेवण भोसले) या दोनच मतदारसंघांत सध्या तिसरी आघाडी लढण्याची तयारी करत आहे.
विद्यमान पक्षीय बलाबल : शिवसेना : 03, भाजप : 02, काँग्रेस : 02, राष्‍ट्रवादी : 01