आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या नगराध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेत ओढाताण, पाच नगरपालिका निवडणुकीत युतीची आशा होतेय धूसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदावर शिवसेनेबरोबरच भाजपनेही दावा केल्याने युतीत ओढाताण वाढली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर वाटाघाटी होऊनही अद्याप युतीचा मार्ग मोकळा झाला नाही. दरम्यान, सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी माजलगावची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असल्याचे असल्याचे जाहीर केले आहे. बीडच्या जागेवरून आता थेेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे.

जिल्ह्यात बीडसह गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, परळी व धारूर या सहा नगरपालिकांची रणधुमाळी सुरू असून भाजप- शिवसेनेत परळी वगळता कोठेही युती झालेली नाही. माजलगाव व बीड या दोन्ही नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेला द्यावी, असा दावा शिवसेनेने केला. परंतु भाजपने माजलगावात शिवसेनेला डावलून जनविकास आघाडीशी घरोबा करत सहाल चाऊस हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे शिवसेना येथे स्वबळावर निवडणूक लढत असून सोमवारी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेत नितीन मुंदडा यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. बीडच्या नगराध्यक्षपदावर शिवसेनेबरोबरच भाजपने दावा केला असल्याने युतीची ओढाताण अधिकच वाढली आहे. शिवसेनेने सुदर्शन धांडे तर भाजपने मुस्लिम चेहरा असलेले सलीम जहांगीर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. जहांगीर यांना उमेदवारी देत भाजपने मुस्लिम मतविभाजनाचा डाव खेळत एमआयएमला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. बीडमध्ये शिवसेनेने ५१ पैकी ३१ ठिकाणी उमेदवारांना एबी फाॅर्म दिले आहेत, तर भाजपने ३८ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. माजलगाव व गेवराई येथे युतीबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख जगताप व भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यात झालेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालेले नाही.

उमेदवार व कार्यकर्त्यांची गोची
माजलगाव, धारूर, गेवराई, अंबाजोगाई व बीड पालिकेत भाजप व शिवसेनेची अद्याप युती झाली नसल्याने सध्या भाजप, शिवसेना उमेदवार व कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. दोन्ही पक्षांकडे चिन्ह असताना केवळ युतीचा निर्णय झाला नसल्याने मतदारांत आवाहन करता येईना. काही नगरपालिकांतील वाॅर्डँत दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवार संभ्रमात सापडले आहेत.

प्रचारपत्रक बनवता येईना
युतीचा निर्णय स्पष्ट झालेला नसल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना अजूनही प्रचारपत्रक, जाहीरनामा बनवता आलेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले तरी अधिकृत उमेदवार कोण हे अजून स्पष्ट नाही. अाधीच वेळ कमी असून या ताणाताणीतच वेळ चालला असल्याचे बीड येथील उमेदवारांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख पालकमंत्र्यांच्या भेटीला : भाजपच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करूनही बीडच्या नगराध्यक्षपदाचा तिढा सुटत नसल्याने अखेर जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे सोमवारी सायंकाळी परळी येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले.
बातम्या आणखी आहेत...