आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी झळांनी बीडमध्ये होरपळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळाचे 1972 पेक्षाही भीषण चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्हे दुष्काळी आहेत. सर्वात वाईट अवस्था बीड जिल्ह्यात दिसते. दै. ‘दिव्य मराठी’ टीमने या भागाचा दौरा करून दुष्काळाचे चित्र पाहिले. पाटोदा, आष्टी, शिरूर, गेवराई आणि बीड तालुक्यात परिस्थिती अतिशय बिकट आहे. आजघडीला जिल्ह्यातील 685 गावे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. पाण्याचे बहुतेक स्रोत आटले आहेत. तुटपुंजे पाणी आहे तेथून पुरवठा केला जातो. 105 टँकर सुरू आहेत. माणसांना प्यायला पुरेसे पाणी नाही, तिथे जनावरांचा प्रश्न दूरच राहिला. सारी शेती उजाड झाली, जनावरे उपाशीपोटी आहेत. नजर जाईल तिथपर्यंत मातकट, वैराण भूभाग. दिवसा उन्हाचे चटके अंग जाळतात. गावागावांत लोकांना आता एकच काम. रोजच्यासाठी पाण्याची सोय करणे. 24 तास तेवढाच एक ध्यास!

गेवराईपासून 20 कि.मी.वरील तलवाड्यात प्रवेश केला की पाण्यासाठी तेथील नागरिकांची सुरू असलेली लढाई दिसते. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 20 हजार आहे. त्यापैकी 15 हजार लोकांची पाण्याची तहान गावातील बारवेत टँकरने टाकलेल्या पाण्यावर भागते. गोविंदवाडी, राहेरी, चव्हाणवाडी, गंगावाडी, राजापूर, पोईतांडा, आनंदवाडी, चावर तांडा, पवार मळा ही आसपासची गावे, वस्त्या येथे कुठेही पाण्याचा थेंब नाही. जे काही हातपंप आहेत, ते आटल्यातच जमा आहेत.


तलवाड्याच्या पाण्यासाठी 7-8 किमी अंतरावर गंगथडीला असलेल्या पांढरी येथे एक बोअर घेण्यात आले आहे. त्यातून गावापर्यंत पाईपलाईन आहे. यातून नळाला पाणी येते ते 8 ते 10 दिवसांतून एकदा. तेही सर्वांना मिळेल याची काहीच शाश्वती नाही. गोदाकाठच्या म्हणजेच गंगथडीच्या गावांत जे काही पाणी शिल्लक आहे ते दुषित आहे. त्यामुळे गंगावाडीसारखा दोन-अडीच हजार लोकवस्तीच्या गावातील लोकांना 4 कि.मी.वरील तलवाड्यातून पाणी आणावे लागते.


गावातील बारवात टँकर ओतले की सारे गाव पोहरे, हंडे, ड्रम, बादल्या घेऊन धावत सुटते. भली थोरली बारव लोकांच्या गर्दीत हरवून जाते. कुणी सायकलला हंडे बांधून येते, कुणी खांद्यावर हंडा हातात बादल्या घेऊन पाण्याची सोय करण्यासाठी धाव घेतात. ते पाणी संपले की खासगी पाणी विक्रेत्यांकडे धाव घ्यावी लागते.
आतापर्यंत कधी एवढी बिकट अवस्था नव्हती असे सांगत गावकरी 122 एकरच्या कोरड्याठाक पडलेल्या तलावाकडे निर्देश करतात. शंभर वर्षे जुना हा तलाव दोन वर्षांपासून कोरडाठाक पडला आहे. त्यात पाणी राहीले की आसपासच्या विहीरींनाही पाणी असायचे. आता त्यात बेशरमाचे जंगल वाढले आहे. तलवाडा आणि परिसरातील लोक आता लग्नकार्यही बाहेरगावी जाऊन करत आहेत. किमान 20 टक्के लोक कामासाठी दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहेत, असे नामदेव काळे म्हणाले. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसचे तालुक्यातील नेते अ‍ॅड. सुरेश हत्ते म्हणाले की, गावातील तलाव साफ केला तर गावचा काय आसपासच्या गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जिल्हाधिकाºयांनी तलावाची पाहणी करून साफसफाईचे 1 कोटी 33 लाखांचे एस्टीमेट केले आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून बेशरमाचे जंगल काढता येत नाही, ही अडचण आहे. तलवाडा आणि टापूतील अवस्थेपेक्षा भयंकर स्थिती केतुरा, बेलुरा, उमरद जहांगीर या गावात पाहायला मिळते. ही गावे बीड तालुक्यातील. हा सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा मतदारसंघ. नारायणगडानजिकची ही गावे बीडपासून अवघ्या 15 किमी अंतरावर आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास उमरद जहागीरच्या लोकांचे डोळे खडकाळ रस्त्यावरून येणाºया टँकरकडे लागलेले असतात. ठरलेल्या ठेप्याला टँकर येऊन उभा राहण्याआधीच हंडे, बादल्यांच्या रांगा लागलेल्या असतात. लहान मुले आसपास खेळत टँकरकडे नजर ठेऊन असतात. टँकर दिसला की आरोळ्या सुरु होतात आणि गर्दी जमा होते. दोन चार हंडे भरेल एवढे पाणी घेण्यासाठी लगबग सुरु होते. गावातील शेतकरी विठ्ठल टाकळे गावाची अवस्था सांगतात. ‘पाण्याची लई वाईट अवस्था आहे. लोकाला खायला नाही, प्यायला पाणी नाही, काम नाही म्हून खर्चायला पैशे नाहीत. कसं होणार सांगा? या बारी पाऊसकाळ नव्हताच हो. खूप जणांच्या तर पेरण्याच झाल्या नाहीत. ज्या लोकानी केल्या त्या तर वायाच गेल्या. असं वाट पाहात पाण्यासाठी दिवस घालवावा लागतो. ’ थोडे पुढे गेल्यावर केतुरा गाव लागते. या गावाची एक वेगळीच त-हा आहे. तिथे स्वजलधारा, जलस्वराज, भारत निर्माण, राष्‍ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याच्या योजना राबवल्या गेल्या. म्हणून गाव टंचाईमुक्त जाहीर झाले. प्रत्यक्षात या योजनेतून एक थेंबही पाणी गावाला मिळाले नाही. सरकारदप्तरी मात्र हे गाव टंचाईमुक्त आहे. या गावात अनेकांनी आपल्या विहीरींची, हातपंपांची खोली वाढवून घेतली. पण पाणी लागले नाही. ज्ञानोबा सपकाळ यांनी विहीरीसाठी 50 हजार खर्च केले, पण टिपूस लागला नाही. जशी त्यांची अवस्था तशीच इतरांची. गावाचे डोळे टँकरकडे. 25 किमीवरून राजुरीच्या तलावातून पाणी घेऊन टँकर येतो. तो कोरड्याठाक विहीरीत ओतला जातो. प्रत्येक घराला दोन-तीन हंडे पाणी मिळते तेवढेच. बेलुºयातसुद्धा भारत निर्माण योजनेतून टाकी उभारली. पाईपलाईनचे काम अर्धवट झाले. दोन वर्षांत ना टाकी भरली ना नळाला पाणी आले. टाकीकडे बघायचे आणि टँकरची वाट पाहायची एवढेच काम बेलुरावासीयांना राहीले आहे.


चौसाळा हे हाय वेवरचे गाव आणि तालुक्याचे ठिकाण. गावातून जातानाच नळासमोर भांड्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात. जवळच्या बोअरमधून देण्याइतके पाणी जमले की या नळाला पाणी येते. चार - पाच दिवसांतून एकदा, तेही तुटपुंजे. पाण्याची आजची ही अवस्था आणि आगामी काळात येणारे भयंकर संकट यामुळे लोक आताच हादरून गेले आहेत. कौंताबाई चव्हाण यांनी पाण्याच्या संकटामुळे आपल्या मुलाचे, अशोकचे लग्नच पुढे ढकलले आहे. 10 मार्चला हे लग्न होणार होते. घरच्यांनाच प्यायला पाणी नाही तर पै पाहुण्यांना काय पाणी देणार असा प्रश्न त्यांनी विचारला. पुष्पा चव्हाण म्हणाल्या की, मी तर लेकीला सांगून टाकलं या बारी उन्हाळ्यात माहेरी येऊ नको म्हणून. आमचं काय होऊ त होऊ तिची कशाला आबाळ करायची?