आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, उस्मानाबादला तडाखा पुन्हा गारपीट; विजेचे 3 बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - महिनाभरापूर्वी गारपिटीने झालेल्या नुकसानीच्या वेदना कायम असतानाच बुधवारी बीड, उस्मानाबादेस अवकाळी पावसाने झोडपले. धारूर व केज तालुक्यांत चार इंच गारांचा थर पाहायला मिळाला. दरम्यान, वीज कोसळून तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. उस्मानाबादेत दोघे, तर बीड जिल्ह्यातील एकाचा मृतांत समावेश आहे. लातूर, नांदेडमध्येही अवकाळी पाऊस झाला.
नवनाथ नरहरी मुळे (35, दैठणा, ता. केज), मंगल अरुण पवार (45, कसबेतडवळ, ता. उस्मानाबाद) व उत्तम भागवत घोळवे (59, सोनारवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. धारूर व केजमध्ये दुपारी 4च्या सुमारास वार्‍यासह गारपीट झाली. यामुळे आंबा, डाळिंबांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. ज्वारी-बाजरीच्या खळ्यावरील कणसे भिजली आहेत. बोराएवढ्या या गारा होत्या. कळंब, उस्मानाबाद तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला. कसबेतडवळेत सकाळी 7 व त्यानंतर दुपारी 4 वाजता वीज पडली. दरम्यान, बीड जिल्ह्यात 24 तासांत गारपीट व पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. त्यानुसार सतर्क राहण्याचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.