आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed Zilha Parishad Election News In Marathi, BJP, Nationalist Congress

झेडपी अध्यक्षपद निवडणूक: बीडमध्‍ये भाजप-राष्ट्रवादीत चुरस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षाची निवड रविवारी दुपारी होत आहे. ३१ सदस्य पाठीशी असल्याचा दावा करत जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने सर्व सदस्यांना व्हीप जारी करत विरोधकांना मतदान केल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या विद्यमान उपाध्यक्षा अर्चना आडसकर यांचे पती रमेश आडसकर यांच्यासह त्यांचे तीन सदस्य आपल्याकडे घेत भाजपने राष्ट्रवादीला हाबाडा दिला. आमदार विनायक मेटे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर यांच्या गटातील बापूराव धोंडे, उद्धव दरेकर भाजपच्याच पाठीशी राहणार असल्याने सदस्यांचा आकडा २९ वर गेला आहे. बहुमतासाठी भाजपला एका मताची गरज आहे; परंतु राष्ट्रवादीचे दोन सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा भाजपने केला असून भाजपचे सदस्य राजस्थानहून पुण्यात पोहोचले आहेत. भाजपचे सर्व सदस्य रविवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेत येणार आहेत.

सदस्यांवर नजर
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव गटाचे जिल्हा परिषद अपक्ष सदस्य शिवाजी किसन डोके व दादेगाव गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य भाऊसाहेब किसनराव पोटे यांना सध्या भाव आला आहे. महसूल राज्यमंत्री सुरेश धस विधानसभा निवडणूक कोठून लढवावी, या संदर्भात कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्यात व्यग्र असले तरी ते या दोन सदस्यांवर नजर ठेवून असल्याने ते सहलीवर न जाता आष्टीतच आहेत.

गटबाजीचा फटका
राष्ट्रवादीकडे सध्या काँग्रेसचा एक सदस्य धरून २९ एवढे संख्याबळ आहे. त्यात राष्ट्रवादीचे २३, स्वाभिमानी आघाडीचे पाच व काँग्रेसचा एक सदस्य असे बलाबल आहे. बहुमतासाठी भाजपप्रमाणे एका सदस्याची गरज आहे. राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदावरून गटबाजी सुरू आहे. उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हेही निश्चित नाही; परंतु अध्यक्षपदासाठी सध्या विजयसिंह पंडित व बजरंग सोनवणे यांच्या नावांची चर्चा आहे.

पंकजा सुचवतील तो अध्यक्ष
केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या सत्तांतरासाठी आमदार पंकजा मुंडे यांची कसोटी लागत आहे. भाजपच्या हाती सत्ता आलीच पाहिजे, याची जबाबदारी त्यांनी भाजप नेते रमेश आडसकर यांच्यावर सोपवली आहे. अध्यक्षपदासाठी रमेश आडसकर, मदनराव चव्हाण, उद्धव दरेकर, जयश्री मस्के यांच्या नावांची चर्चा असली तरी पंकजा मुंडे ज्याचे नाव सुचवतील तोच अध्यक्ष-उपाध्यक्ष ठरेल, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे भवितव्य पंकजांच्या हाती आहे. या प्रक्रियेत भाजपने कमालीची गुप्तता पाळली अाहे.

जालन्याचे सदस्य सहलीवर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड रविवारी होणार आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे १५जिल्हा परिषद सदस्य सहलीवर अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी एक दिवस अगोदर शिवसेनेचे सदस्य गेले आहेत.

अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी शिवसेनेकडे अध्यक्षपद होते. आता हे पद भाजपला िमळेल. भाजपकडून अध्यक्षपदासाठी तुकाराम जाधव, रामेश्वर सोनवणे, भगवान तोडावत, वर्षा देशमुख, शीतल गव्हाड यांची नावे चर्चेत आहेत, तर शिवसेना पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असून माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, संभाजी उबाळे यांची नावे आघाडीवर आहेत. विद्यमान उपाध्यक्ष राहुल लोणीकरसुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.