आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हा बँकेत 1 कोटीचा घोटाळा; संचालक मोकळे अन् अधिका-यांवर ठपका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पाच वर्षांपूर्वीचा सुमारे 1 कोटी 14 लाख रुपयांचा रोखे घोटाळा उघडकीस आला आहे. लेखा परीक्षण अहवालातून समोर आलेल्या या घोटाळ्यातून संचालक मंडळ मोकळेच राहिले असून केवळ तीन अधिकाºयांना दोषी ठरवण्यात आले आहे. तत्कालीन व्यवस्थापक शिरीष देशपांडे, मुख्याधिकारी एम. एम. धायगुडे, हिशेबनीस एम. एम. ताडलिंबेकर अशी त्यांची नावे आहेत.
बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह पाचशेहून अधिक जणांवर गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त झाल्यापासून वसुली आणि कारवाईला गतीही आली. बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष शिवानंद टाकसाळे यांनी बँकेच्या लेखा परीक्षण अहवालास विलंब लागत असल्याने जिल्हा विशेष लेखा परीक्षक बी. बी. परतूडकर यांच्यविरुद्ध सहकार आयुक्तांकडे गोपनीय अहवाल पाठवला. परतूडकर यांना प्रशासकीय मंडळातून कमी करण्यात यावे, त्यांच्यावर कारवाई करावी, असे सुचवण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी लातूरचे विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर, बी.बी.परतूडकर तसेच बँकेच्या अधिकाºयांची बैठक घेतली. 28 संस्थांचे लेखा परीक्षण 12 जुलैपर्यंत करण्याला मुदत दिली. रोखे खरेदी-विक्री व्यवहारातील घोटाळ्याचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हा अहवाल प्राप्त झाला आहे.
बँकेने सन 2005-06 मध्ये इंडस्ट्रियल इन्व्हेसमेंट बँक आॅफ इंडिया (आयआयबीआय) कडून 9 टक्के दराने 320.79 लाखांचे रोखे खरेदी केले. 24 हजार चाळीस रुपयांप्रमाणे 1335 रोखे खरेदी करण्यात आले, परंतु रोखे खरेदी दिनांकांवर रोख्याची किंमत 20 हजार प्रती रोखे एवढीच होती. त्यामुळे या रोखे खरेदी व्यवहारात सुमारे 53 लाख रुपयांचा तोटा बँकेला सहन करावा लागला. विशेष म्हणजे हे रोखे खरेदी करताना आरबीआय आणि निबंधकांची मंजुरी घेण्यात आली नाही. डिलिस्टेड कंपनीकडून रोखे करण्यात आले. एकाच ब्रोकरकडून पाच टक्क्यांहून रोखे खरेदी झाली. बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसताना राज्य सहकारी बँकेकडून ओव्हर ड्राफ्ट घेऊन रोखे खरेदी करण्यात आल्याचे लेखा परीक्षण अहवालात समोर आले.
रोखे खरेदीत गैरव्यवहार झालाच, शिवाय रोखे विक्रीतही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. 2010 मध्ये कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने सुमारे 72 लाख रुपये किमतीचे रोखे 39 लाख 7 हजार रुपयांना, तर 1 कोटी 82 लाख 70 हजार 400 रुपयांचे रोखे केवळ 1 कोटी 70 हजार रुपयांमध्ये विक्री केले. यात बँकेला 32 लाख 25 हजार आणि 84 लाख 400 रुपयांचा तोटा झाला.
कारवाई लवकरच - रोखे खरेदी-विक्री प्रकरणाचा अहवाल प्राप्त झालाय. 28 संस्थांच्या लेखा परीक्षणास 12 जुलैपर्यंतची मुदत आहे. रोखे घोटाळाप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल.- शिवानंद टाकसाळे, अध्यक्ष, जिल्हा बँक प्रशासकीय मंडळ.
स्वाक्ष-या नाहीत- बँकेने स्थापन केलेल्या गुंतवणूक उपसमितीवर केवळ अधिकाºयांची नियुक्ती होती. त्यामुळे त्यांनीच मान्यता दिली. कागदपत्रांवर तत्कालीन संचालकांच्या स्वाक्ष-या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली नाही. - बी. बी. परतूडकर, जिल्हा विशेष लेखा परीक्षक.