Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Beed Zp Office Issue

बीड जिल्हा परिषदेचा कारभार चालतो रामभरोसे !

मुकुंद कुलकर्णी | Sep 01, 2011, 11:36 AM IST

  • बीड जिल्हा परिषदेचा कारभार चालतो रामभरोसे !

बीड - जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा एकछत्री अमल आणि राज्यमंत्रिमंडळात दोन मंत्री असूनही मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत मुख्य कार्यकारी अधिका-यांसह तब्बल एकाहत्तर खातेप्रमुखांची पदे रिक्त आहेत.
मेच्या अखेरीस रुजू झालेले राजाराम माने यांना येथील काही कळण्याच्या आतच शिक्षकांच्या बदल्यांवरून रणकंदन माजल्याने दीर्घ रजेवर जाणे भाग पडले. चार जूनपासून दीर्घ रजेवर गेलेले माने पुन्हा यावेत, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. दरम्यान दोन महिन्यांनंतर ते पुन्हा रुजू झाले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर यांचीही एकट्यांचीच सातारा जिल्हा परिषदेत बदली झाली. मुंबईला बैठकीसाठी गेलेले कोहिनकर बीडला न परतताच थेट साता-यात रुजू झाले. त्यामुळे त्यांचेही पद रिक्त झाले.
श्री. माने आणि कोहिनकर या दोन्ही वरिष्ठ अधिकारी नसल्याने दोन महिने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांच्याकडे हे अतिरिक्त पदभार आले. शिक्षकांच्या बदल्या व अन्य कामे त्यांनी सोयीप्रमाणे करण्यावर भरही दिला. परंतु, त्यांनाही जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक कालावधी झाल्याने त्यांचीही बदली औरंगाबादला झाली आहे.
पालकमंत्र्यांशी चर्चा...- जिल्हा परिषदेतील अधिका-यांची एकेक पदे रिक्त होत आहेत. ही पदे भरण्यासंदर्भात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना भेटून चर्चा केली आहे. बदल्यांचा हंगाम संपला असला, तरी पालकमंत्री बीडला अधिकारी आणतील. -गंगाधर घुमरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद
अधिकारी आणण्याचा प्रयत्न - जिल्हा परिषदेतील कारभार सुरळीत होण्यासाठी अधिका-यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. चांगले अधिकारी बीडमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. -जयदत्त क्षीरसागर, पालकमंत्री
गढूळ वातावरण - तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर नोकरभरती प्रकरणात तर बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. आर. भारती खून प्रकरणात अडकल्याने निलंबित झाले. त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेतील वातावरण गढूळच होत गेले. त्यात सुधारणा होण्याऐवजी वाढच होत गेल्याने जिल्हा परिषद चर्चेत आली. शिक्षण विभागासह बांधकाम विभागातील अधिका-यांवरही हल्ले झाले.
रिक्त पदांचा डोंगर... - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गटविकास अधिकारी : चार, गटशिक्षणाधिकारी : पाच, कार्यकारी अभियंता : तीन, उपअभियंता : अकरा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एक, वैद्यकीय अधिकारी २६, पशुधन विकास अधिकारी : १७, बालकल्याण अधिकारी पाच असे सुमारे ७१ अधिकारी पदे रिक्त आहेत.

Next Article

Recommended