आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक जमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - खुलताबादेतील भद्रा संस्थान हनुमान जयंतीसाठी सज्ज झाले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येणार आहेत. दर्शनासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.

मंगळवार, 15 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सोमवारी रात्रीपासूनच औरंगाबाद, जालना, अहमदनगर जिल्ह्यांतील भक्तांसह राज्यभरातील भाविक भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादेत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. भद्रा मारुती संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराभोवती सुंदर सजावट करण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्यास कुठलीही अडचण येऊ नये म्हणून संस्थानच्या वतीने दर्शनरांगेसाठी बॅरिकेड्स लावले आहेत. शिवाय मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रथमोपचारांचीही सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षतेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांना औरंगाबाद ते खुलताबाद या मार्गावर ठिकठिकाणी विविध सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष, मित्रमंडळे तसेच वैयक्तिकांकडून दूध, फळे, साबुदाणा खिचडी आदी फराळाच्या पदार्थांसह पाण्याचे वितरण करण्यात येते. पायी येणारे भाविक हे दौलताबाद घाट चढण्यासाठी घाटातील डोंगराच्या पाऊलवाटेचा वापर करत असल्याने या ठिकाणी त्यांना घाट चढण्यास सोयीस्कर व्हावे म्हणून लांब दोरखंड व फोकसची व्यवस्था केली जाते.

हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे महाभिषेक व महाआरती झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनास सुरुवात होते. मंदिर परिसरात हनुमान जयंतीनिमित्त रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. भास्करगिरी महाराज रसाळ यांनी रामकथा सांगितली. मंगळवारी रामानंदगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

अडीच लाखांचा सोन्याचा गंध अर्पण
भद्रा मारुती मूर्तीस जैनसुख शेठ यांनी अडीच लाख रुपयांचा सोन्याचा गंध सोमवारी अर्पण केला असून या वेळी त्यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष काशीनाथ बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे आदींची उपस्थिती होती.