आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतगावकरांच्या हालचालींवर चव्हाणांचे मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मी अत्यंत दु:खद अंत:करणाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले. त्यांच्या या निर्णयावर मंगळवारी अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

भास्करराव पाटील खतगावकर 40 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. स्व. शंकरराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आमदार, खासदार, राज्यमंत्री अशी पदे त्यांनी भूषवली. त्यांच्या राजकारणाची पाळेमुळे ग्रामीण भागात खोलवर रुजलेली आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील ते काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. देशात काँग्रेस सर्वत्र संकटात असताना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाशी काडीमोड घेणे हे जिल्ह्यातील काँग्रेसला हानिकारक ठरणारे आहे.

भास्करराव पाटील हे अशोक चव्हाणांचे सख्खे मेहुणे आहेत. राजकीयदृष्ट्या चव्हाण अगोदरच अडचणीत आहेत. अशा अडचणीच्या काळात घरातील नातलगांनी अडचणीत आणले तर राजकीयदृष्ट्या त्यांना परवडणारे नाही.

भास्करराव पाटलांनी काँग्रेस सोडताना चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर दोषारोप केले आहेत. ही बाब चव्हाणांसाठी अडचणीची आहे. भास्करराव पाटलांनी काँग्रेस सोडली तरी चव्हाण जिल्ह्यातील काँग्रेसला कसेबसे सावरतील; परंतु राज्याच्या राजकारणात मात्र त्यांच्या इमेजला धक्का बसणार हे निश्चित आहे. खुद्द अशोक चव्हाणांनाही त्याची जाणीव आहे. भास्करराव पाटलांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर करताच सोमवारी चव्हाण शहरात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम डॅमेज कंट्रोलचा कार्यक्रम हाती घेतला. सर्व शक्यतांची पडताळणी केली. भास्करराव पाटील काँग्रेस सोडताहेत हे वृत्तपत्रातील बातम्यांवरून कळले. यासंदर्भात त्यांच्याकडून अधिकृत माहिती माझ्यापर्यंत आल्याशिवाय यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी मंगळवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

दादांची खेळी काय?
खतगावकरांच्या (दादा) निर्णयानंतर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचे पेव फुटले. त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही, अशी चर्चा चव्हाण सर्मथकांमध्ये आहे. चव्हाणांवर सध्या बडतर्फीची टांगती तलवार आहे. यदाकदाचित ही कारवाई झालीच तर भाजपच्या वतीने उमेदवारी दाखल करून पुन्हा लोकसभेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भाजपकडेही आजमितीला लोकसभेसाठी तुल्यबळ उमेदवार नाही. भास्करराव पाटलांनी मात्र आपल्या पुढील चालीबाबत अद्यापही मौन पाळले आहे.