आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhaskarrao Khatgaonkar News In Marathi, Ashok Chavan, Divya Marathi

भास्करराव खतगावकरांच्या राजीनाम्याने चव्हाणांच्या नेतृत्वाला धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नांदेडमध्ये आले असतानाच गुरुवारी माजी खासदार व शंकरराव चव्हाणांचे जावई भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. काही दिवसांपासून ते काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होतीच. खतगावकरांच्या राजीनाम्यामुळे त्यांचे मेव्हणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रतिमेला तडा गेला असून नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

संपूर्ण राज्यात नांदेडची ओळख काँग्रेसमय जिल्हा अशी आहे. या जिल्ह्यातील विधानसभेच्या ९ पैकी ९ जागा काँग्रेस आघाडीच्या (७ काँग्रेस, २ राष्ट्रवादी) ताब्यात आहेत. विधान परिषदेतही काँग्रेसचा प्रतिनिधि आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे जे दोन खासदार विजयी झाले आहेत, त्यापैकी एक जागा नांदेडची आहे. महापालिका व जिल्हा परिषदेतही काँग्रेसची सत्ता आहे. २००९ मध्ये मुख्यमंत्रिपदी असताना चव्हाणांनी ही किमया घडवली होती. यामुळेच काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा निर्माण झाला हाेता. चव्हाणांचा तो वचक आजही जिल्ह्यावर कायम आहे. देशात मोदींची लाट असतानाही लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी बालेकिल्ला राखला, परंतु केंद्रातील सत्ता गेल्यानंतर मात्र काँग्रेस अडचणीत आली.
त्याच अडचणी आता काँग्रेसमय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातही निर्माण होत आहेत.

जिल्ह्यातील विराेधी पक्षांचे बळ वाढले
खतगावकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. शंकरराव चव्हाणांचे जावई अशी त्यांची ओळख आहे. जिल्हा बँक, साखर कारखाना आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांची तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली आहे. चव्हाण कुटुंबीयांपैकीच एक अशीच ओळख असल्याने कार्यकर्तेही त्यांच्याशी जोडले गेले. आता तेच काँग्रेस सोडत असल्याने संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे. खुद्द चव्हाणांसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे. चव्हाणांच्या तोडीचा एकही नेता आजपर्यंत जिल्ह्यात विरोधी पक्षाजवळ नव्हता. आता खतगावकरांच्या माध्यमातून विरोधकांना चव्हाणांच्या विरोधात आयतेच नेतृत्व मिळाले आहे.

तीन जागांवर काँग्रेसला धाेका
नातेसंबंध असतानाही लोकसभेत अशाेक चव्हाणांनी आपली उमेदवारी कापल्याचा खतगावकरांच्या मनात राग आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. खतगावकरांमुळे भाजपला जिल्ह्यात वजनदार नेता लाभेल, पण त्याहीपेक्षा ते चव्हाणांवर दोषारोपण करून जात असल्याने संपूर्ण राज्यात चव्हाणांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेतही ही बाब चव्हाणांना अडचणीत आणू शकते. देगलूर, मुखेड, नांदेड येथे त्यांचा प्रभाव असल्याने काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.