आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, अशोकरावांच्या कार्यपद्धतीवर रोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. अनेक पक्षांकडून ऑफर आहेत. पण कोणाकडे जायचे याचा निर्णय अजून घेतला नसल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणूका तोंडावर चव्हाणांना हा मोठा राजकीय धक्का आहे.

काँग्रेस सोडत आहे. पण आगामी निवडणूक लढणार नाही. पदाच्या लालसेने दुसर्‍या पक्षात जात नाही, असे स्पष्ट करून खतगावकर म्हणाले, चव्हाणांची कार्यपद्धती चुकीची आहे. त्यांना कार्यकर्त्यांचा मान-सन्मान करता येत नाही. त्यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी सोडली. प्रचारात सहभागी झालो; पण त्यांनी कधी सन्मानाची वागणूक दिली नाही. साधे पत्रिकेत नाव टाकण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही. दु:खद अंत:करणाने व निराशेने मी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, खतगावकरांची दोन दिवसांपासून मनधरणी सुरू आहे. पालकमंत्री डी.पी. सावंत, आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी त्यांची भेट घेतली.
मात्र, खतगावकर काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

चव्हाणांचे मेहुणे
अशोक चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. प्रत्येकी तीन वेळा बिलोलीतून आमदार व नांदेडचे खासदार म्हणून खतगावकर निवडून आले. राज्यमंत्री राहिले.