आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराजांच्या कारला अपघात, किरकोळ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सूर्योदय परिवाराचे प्रमुख संत उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यू महाराज अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले. परभणी व अंबाजोगाई येथील कार्यक्रम आटोपून ते कारने कळंबमार्गे उस्मानाबादकडे निघाले असता युसूफ वडगावजवळ शुक्रवारी रात्री ९.१५ च्या दरम्यान हा अपघात झाला.

भय्यू महाराज यांच्या मेहुण्याचे उस्मानाबाद येथे शुक्रवारी सायंकाळी लग्न होते. त्याचबरोबर महाराजांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार भय्यू महाराज परभणी येथील कार्यक्रम आटोपून अंबाजोगाईमार्गे उस्मानाबादकडे निघाले होते. त्यांचे वाहन ९.१५ ते ९.३० वाजेच्या सुमारास अंबाजोगाई - कळंब मार्गावरील युसूफ वडगावजवळ पोहोचले असता समोरून एक जीप थेट महाराजांच्या कारच्या दिशेने आल्याने चालकाने जोरात ब्रेक लावला. या वेळी जोराचा हादरा बसून महाराजांना दुखापत झाली. या अपघातात भय्यू महाराजांच्या डाव्या पायाला, छातीजवळ व डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ दुस-या वाहनातून थेट उस्मानाबाद येथे उपचारासाठी दाखल केले.

या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या सावंत नामक अन्य एकास डोक्याला दुखापत झाली आहे. उस्मानाबाद येथे प्रथमोपचार करून त्यांना खबरदारी म्हणून सोलापूरला हलवले. दरम्यान, महाराजांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मोबाइल घेण्यासाठी वाकले अन्...
कारमध्ये भय्यू महाराज पुढील सीटवर बसले होते. त्याच वेळी त्यांचा हातातील मोबाइल खाली पडला. सीटबेल्ट लावलेला असल्याने मोबाइल घेण्यासाठी वाकता येत नसल्याने महाराज सीटबेल्ट काढून मोबाइल घेण्यासाठी खाली वाकले. याच वेळी समोरून आलेल्या वाहनामुळे चालकाने जोराचा ब्रेक लावल्याने महाराज डॅशबोर्डवर आदळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.