आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील मोठ्या धरणांत उपयुक्त पाण्याचा साठा शून्यावरच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 जून ते 11 जुलैदरम्यान सर्वच भागांत जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे. वरुणराजाच्या कृपेनंतरही मराठवाड्यातील मोठ्या धरणांत उपयुक्त पाण्याचा साठा मात्र शून्यच आहे. त्यामुळे मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट अद्यापही दूर झालेले नाही. जुलै मध्यावर आला तरी जायकवाडीसह माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर या मोठ्या प्रकल्पांत आजही शून्य टक्के पाणीसाठा आहे.


मराठवाड्यात 11 मोठे, 75 मध्यम आणि 717 लघु असे एकूण 803 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची क्षमता 7573 दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांत केवळ 8 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा साठा 5 टक्के होता. मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, माजलगाव, येलदरी, मांजरा, निम्न दुधना, सिना कोळेगाव व सिद्धेश्वर या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. यावर्षी जर हे प्रकल्प तुडुंब भरले नाहीत तर पुढच्या वर्षीही मराठवाड्याला पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.


विशाखापट्टणमजवळील कमी दाबाचा पट्टा छत्तीसगड, विदर्भ व पूर्व महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सरकला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची दिशा व वेग पाहता शुक्रवारी कमी दाबाचा पट्टा कमकुवत होऊन दक्षिण महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित आहे. तथापि, मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची शक्यता असल्याचे एमजीएम खगोलशास्त्र केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.


नांदेड : सरासरीपेक्षा जास्त
1 जून ते 10 जुलैदरम्यान जिल्ह्यात सरासरी 310.67 मि.मी.पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या 32.51 टक्के हा पाऊस आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 165.56 मि.मी. पाऊस झाला.


परभणीत मुसळधार
जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात दोन वेळा 50 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना चांगले पाणी आले आहे. बुधवार, गुरुवार सलग दोन दिवस पाऊस झाला.