माजलगाव- माझ्या ठेवलेल्या नवऱ्याच्या घरी जाऊन तू का भांडलीस या कारणावरून मोठ्या बहिणीने लहान बहिणीचे डोके भिंतीवर आदळत तिचा खून केल्याची घटना माजलगाव शहरातील गौतमनगर भागात बुधवारी रात्री नऊ वाजता घडली. अश्विनी आश्रुबा जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.
माजलगाव शहरातील गौतमनगर भागातील रहिवासी असलेली महानंदा आश्रुबा जाधव ही महिला बुधवारी रात्री नऊ वाजता तिची दुसऱ्या क्रमांकाची बहीण अश्विनी आश्रुबा जाधव हिच्या घरी गेली होती. मी ठेवलेला नवरा दशरथ माळी याच्या पाॅवर रोडवरील घरी जाऊन तू कशामुळे भांडलीस, अशी विचारणा तिने अश्विनीकडे केली. तेव्हा महानंदा अश्विनी यांच्यात बाचाबाची होऊन दोघीत वाद झाला. तेव्हा घरासमोरच अश्विनीच्या केसाला धरून महानंदाने तिचे डोके भिंतीवर आदळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने बेशुद्ध झालेल्या अश्विनीचा मृत्यू झाला या प्रकरणी सर्वात लहान बहीण माधवी आश्रुबा जाधव हिने माजलगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून महानंदाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी शिनगारे करीत आहेत.