आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बिंदुसरा’त 50 टक्के गाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील उदासीनतेमुळे बीड शहरासाठी एकेकाळी वरदान ठरणारा पालीजवळील बिंदुसरा मध्यम प्रकल्प गाळातच रुतत चालला आहे. सध्या पाण्याऐवजी 50 टक्के गाळच साठला आहे. गेल्या 57 वर्षांत या प्रकल्पातील गाळ काढण्याला मुहूर्त सापडलेला नाही. 25 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक राहिला असून पाणीपातळी जोत्याखाली सरकली आहे.
शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेला बिंदुसरा मध्यम प्रकल्प 1955 मध्ये बीडच्या पाटबंधारे विभागाने बिंदुसरा नदीवर बांधला. 7.90 द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता असणा-या या प्रकल्पात 7.11 द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा राहतो. याच साठ्यातून बीड नगरपालिकेला दर तीन दिवसांना आठ मिलियन लिटर पाणीपुरवठा केला जातो. ईदगाह नाका येथे जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी येते, तर माजलगाव येथील प्रकल्पातून बॅकवॉटरचे 20 मि. लि. पाणी ईट येथील जलशद्धीकरण केंद्रात आणण्यात येते. शहरासाठी 28 मि. लि. पाणी लागते. दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस न झाल्याने बिंदुसरातील पाणीपातळी घटल्याने आता शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या या प्रकल्पात केवळ 0.79 द.ल.घ.मी. एवढाच पाणीसाठा असून तोही मृत आहे. त्यामुळे तो मोजता येत नाही. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हीच पाणीपातळी 67 टक्के होती.
आता 31 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक राहिला असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी दिली. गतवर्षी बीड शहरासाठी 3.78 द.ल.घ.मी. पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. या वर्षी 4.72 द.ल.घ.मी. पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे या वर्षी खरिपांच्या पिकांसाठी पाणी मिळणार नाही. पाण्याअभावी पालीसह वरवटी, आहेरधानोरा, पालवण, पिंगळे तरफ, बलगुजार व बीड या भागांतील शेतक-यांची पिके धोक्यात आहेत.