आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातुरातील पाणथळांवर पक्ष्यांची मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जिल्ह्यात यावर्षी मोजक्याच जलस्रोतांना पाणी असून अशी ठिकाणे पाणपक्ष्यांनी फुलून गेली आहेत. विशेष म्हणजे यात हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या परदेशी पक्ष्यांचाही मोठ्या संख्येत समावेश आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षी अभ्यासकांनी मंगळवारी काही तलावांना भेटी दिल्या यात त्यांना पाणपक्ष्यांच्या विविध 35 प्रजाती दिसल्या.

जिल्ह्यातील बहुसंख्य तलाव यावर्षी कोरडे आहेत. तथापि, अहमदपूर, चाकूर व रेणापूर तालुक्यांतील काही तलावांना भरपूर पाणी आहे. हे तलाव पाणपक्ष्यांसाठी पर्वणी ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पक्षी अभ्यासक सुजित नरवडे, टॅक्सिडर्मिस्ट विठोबा हेगडे व त्यांच्या टीमने अहमदपूर तालुक्यातील व्हटी, कोपरा, किनगाव व चाकूर तालुक्यातील शिवणी मजरा, दापक्याळ येथील तलावांची पाहणी केली. कोपरा तलावात ओरिएंटल डार्टर, खग ( ब्लॅक टेल्ड गॉडविच). लालक्षरी (कॉमन पोचर्ड), तलवार बदक (नॉर्दन पिनटेल), गार्गेनी जातीची सायबेरियन पट्ट्यातून येणारी बदके हजारोंच्या संख्येत आढळली. उपजत लावण्य लाभलेले हे पक्षी थंडी व अन्न दुर्भिक्षापासून स्वत:ला वाचवण्यासाठी साधारणपणे ऑक्टोबरपासून भारतात येतात. जलचर व जलवनस्पतींची उपलब्धता असलेल्या पाणथळांवर त्यांचे थवे उतरतात, असे नरवडे म्हणाले.पक्ष्यांची शिकार करणा-या दलदल बहिरी ससाण्याच्या दोन जोड्या या भागात दिसल्या. पक्ष्यांची अशीच गर्दी शिवणी मजरा येथील तलावावर दिसली.

भक्ष्याच्या शोधात तळ्याकाठी बसलेले स्पून बिल, ग्रे हेरॉन, इग्रेट जातीचे बगळे, हिरवळीवरील कीटक टिपणा-या अन् पाण्यात सुरंग मारून आपली ओळख देणा-या जांभळ्या पाणकोंबड्या, कृष्णधवल खंड्या, रंगीत धीवर या तलावावर अधिक संख्येत आढळले. जलवनस्पती, छोटे मासे, कालव, गोगलगाय, बेडूक हे पाणपक्ष्यांचे खाद्य असते. अधिक पाणी व दलदलीच्या ठिकाणी हे खाद्य विपुल प्रमाणात आढळते त्यामुळेच अशा ठिकाणचा अधिवास पक्षी पसंत करतात.माणसांचा वावर नसलेल्या ठिकाणी पक्ष्यांना मुक्तपणे त्यांना भक्ष्य शोधता येते त्यामुळे अशा पाणवठ्यांवर पक्षी दिसून येतात.
पक्षी निरीक्षणाची संधी
लातूर जिल्ह्यात पाणपक्षी पाहण्याची संधी या पाणवठ्यांवर उपलब्ध झाली आहे. यातील काही पक्षी परदेशातून स्थलांतर करून आलेले आहेत. त्यांचा मुक्काम एप्रिलपर्यंत असतो. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघतात. त्यामुळे हे पक्षी पाहण्याचा हा काळ उत्तम आहे.
सुजीत नरवडे, पक्षी अभ्यासक, मुंबई
संकटग्रस्त पक्षी...
ओरिएंटल डार्टर, ब्लॅक टेल्ड गोंडविट, रिवरटर्न, ब्लॅक हेडेड आयबीस, पेंटेड स्टार्क.