आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार अंकही गाठू शकला नाही भाजप, परभणीतील चार पालिकांत नगराध्यक्षपदाचे चित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने या वेळी मोठा गाजावाजा करत जिल्ह्यातील सात पालिकांत नगराध्यक्षपदाचे सातही व नगरसेवकांच्या १४७ पैकी ११७ जागांवर उमेदवार उभे केले. शिवसेनेशी युती तुटल्याने मतांचे विभाजनही झाले असले तरी गंगाखेड वगळता सहाही पालिकांत भाजपला दारुण पराभवाला तोंड द्यावे लागले. चार पालिकांत मतदानाचा चार अंकी आकडाही गाठता आला नाही.

मुळातच, जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व सुरुवातीपासूनच वाढलेले आहे. युतीतून विधानसभेला गंगाखेडसारखा मतदारसंघ मिळत असतो. याच मतदारसंघात गंगाखेडमध्येच भाजपची थोडीफार ताकद आजवर राहिलेली आहे. गंगाखेड पालिका व तेथील पंचायत समितीत पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. जिल्हा परिषदेत दोन सदस्य देण्याचेही काम याच तालुक्यातून झालेले आहे. परंतु या वेळी भाजप सत्तेत असल्याने पक्षाने सर्वत्र उमेदवार दिले. पालिका हा शहरी मतदारसंघ असल्याने भाजपला थोड्याफार प्रमाणात का होईना, यश मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षाला पाच पालिकांत नगराध्यक्षपदासाठी चार अंकी आकडाही गाठता आलेला नाही. गंगाखेडमध्ये नेहमीप्रमाणेच पक्षाने अस्तित्वाची लढाई करूनही माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी निकराची लढत देऊनही त्यांचा ६५९ मतांनी पराभव झाला. चार नगरसेवक तरी निवडून आले. मागील वेळीही अशीच संख्या या पालिकेत नगरसेवकांची होती.

गंगाखेड वगळता पूर्णेत पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पाबाई कुलथे यांनी चार अंकी आकडा ओलांडला. त्यांना १३२५ मते मिळाली. मात्र, हाही आकडा विजयी उमेदवाराच्या पाच पट मागे आहे. त्यांना चौथ्या क्रमांकावर राहावे लागले. मानवतमध्येही शकुंतला काळे यांनी १७१५ मतांपर्यंत मजल मारली. सोनपेठ पालिकेत पद्मा देशमुख यांना ६४२, पाथरीत उषा भगवान कांबळे यांना ८९४, जिंतुरात सुमनबाई आदमाने यांना ९०६, तर सेलूत प्रसाद खारकर यांना ६७२ मते मिळाली. नगराध्यक्षपदाच्या या उमेदवारांना चार पालिकांत चार अंकही गाठता आले नाहीत.

पराभवाची कारणे...
जिल्ह्यात भाजपला आजवर प्रभावी नेतृत्वच मिळालेले नाही. गंगाखेड विधानसभेचे दोन वेळा सदस्यत्व भूषविण्याचा मान मिळाल्यानंतर मागील विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर हा मतदारसंघही रासपकडे देण्यात आला. पाथरी मतदारसंघही मित्रपक्षाला देण्यात आला होता. जिंतूर-सेलू व परभणी या दोन मतदारसंघांत पक्षाने ताकद आजमावली. त्यात परभणीत पक्षाला चांगले मतदान मिळाले होते. विधानसभेपाठोपाठ पालिकांच्या निवडणुकीत अशीच स्थिती राहिली आहे. स्थानिक नेतृत्वाचा अभाव, योग्य नियोजनाचा अभाव, पक्ष-संघटनेचे अपुरे नेटवर्क, कार्यकर्त्यांची कमतरता आदी कारणेही पालिकेतील पराभवामागे सांगितली जातात.
बातम्या आणखी आहेत...