आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप आमदार सरसावले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - डेंग्यूमुळे रक्ताची वाढती मागणी आणि बीड, अंबाजाेगाईच्या रक्तपेढीतील तुटवडा लक्षात घेऊन रक्तासाठी रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील भाजप आमदार सरसावले असून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारी जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
जिल्हाभरात डेंग्यूची साथ सुरू आहे. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरातील पांढ-या रक्तपेशी, प्लेटलेटस कमी होत असल्याने डेंग्यूबाधित रुग्णांना रक्त देणे गरजेचे असते. वाढती रुग्णसंख्या, अपघात इतर आजारांतही रक्ताची आवश्यकता असल्याने दोन महिन्यांत रक्ताच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अंबाजोगाईच्या एसआरटी रुग्णालय व बीडच्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासदार डॉ. प्रीतम मुंडेंनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ आपल्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तपेढ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच आमदारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

रक्तदानासाठी टीम सज्ज
जिल्ह्यात एकाच वेळी शिबिराचे नियोजन करण्यात येणार असले तरी सर्व आमदारांचे पत्र अद्याप मिळालेले नाही. मात्र, आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा-यांना मदतीसाठी बोलावण्यात आले आहे. ब्लड बँकेची रक्तपिशव्या साठवण्याची क्षमता लक्षात घेऊन एकाच वेळी शिबिर घेण्यापेक्षा वेगवेगळ्या दिवशी शिबिर घेण्यासाठीही आम्ही संयोजकांना विनंती करणार आहोत, असे जिल्हा रुग्णालयातील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. जयश्री बांगर यांनी सांगितले.

रक्तपेढीसाठी मेट्रो लाभदायक
भाजपच्या या रक्तदान शिबिरांमुळे जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीला मेट्रोचा दर्जा मिळण्यासाठीच्या उद्दिष्टालाही मदत होणार आहे. दोन महिन्यांत रक्तपेढीला तीन हजार रक्तपिशव्यांचे संकलन करायचे असून जिल्हाभरात होणा-या या शिबिरांमुळे तीन हजारांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठीही मोठी मदत होईल.

कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे
खासदार प्रीतम मुंडे यांच्या आदेशाने या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिरात सहभागी व्हावे. मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलनाचे आमचे उद्दिष्ट असेल. - रमेश पोकळे, जिल्हाध्यक्ष, भाजप
सामाजिक भावनेतून
प्रीतम स्वत: डॉक्टर असल्याने त्यांना याची जाण आहे. सर्वच आमदारांना आयोजन करण्याचे सांगितले आहे. सामाजिक भान म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे. रक्तपेढीला मदतीचे आमचे प्रयत्न असतील. - संगीता ठोंबरे, आमदार, केज विधानसभा