आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर बाजार समितीमध्ये भाजपची मुसंडी, माजी आमदार कव्हेकरांचा धक्कादायक पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या १८ पैकी १४ जागांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यामध्ये काँग्रेसला जोरदार धक्का देत भाजपच्या पाच जागा निवडून आल्या. उर्वरित नऊ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. विशेष बाब म्हणजे काँग्रेसच्या पॅनलचे उमेदवार असलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. उर्वरित चार जागांचे निकाल उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जाहीर झाले नाहीत. त्या चारही जागा आपल्यालाच मिळतील असा दावा भाजप आणि काँग्रेसने केल्यामुळे बाजार समितीवर कोणाचा सभापती होईल हे लवकरच स्पष्ट होईल.

लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने, बँकांच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे बाजार समितीची निवडणूकही आपण सहज जिंकू, असा आत्मविश्वास आमदार अमित देशमुखांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पॅनलला होता. मात्र, बुधवारी १८ पैकी १४ जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात भाजपच्या पाच जणांनी विजय मिळवला. उर्वरित नऊ जागा राखण्यात काँग्रेसला यश आले. तरीही प्रमुख उमेदवार असलेले माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा पराभव झाला. तालुक्यातील १०० पैकी ९० सोसायट्या ताब्यात असतानाही त्या मतदारसंघातून कव्हेकरांचा पराभव झाला. तसेच भाजपच्या तीन जागा १५ ते २० मतांच्या फरकांनी पडल्या. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे चेहरे पडले. दुपारनंतर व्यापारी मतदारसंघ आणि हमाल-मापाडी मतदारसंघातील जागांवर विजय मिळवल्यामुळे किमान निम्म्या जागा मिळवल्याचे समाधान मानत काँग्रेस नेते घरी परतले. ग्रामपंचायत मतदारसंघातील चार जागांचे निकाल न्यायालयाच्या आदेशामुळे राखीव ठेवण्यात आले. या चारही जागांवर भाजप आणि काँग्रेसने निवडून येण्याची खात्री असल्याचे सांगितले आहे. यातील एकही जागा निवडून आली तर काँग्रेसची सत्ता कायम राहणार आहे.
स्वकीयांकडून विश्वासघात
काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सोसायटी मतदारसंघातून मी उभा होतो. मात्र, काँग्रेसच्याच मंडळींनी कोणाच्या तरी सांगण्यावरून मला ऐनवेळी मतदान केले नाही. पक्षातीलच काही लोकांनी विश्वासघात केला आहे. हा माझा वैयक्तिक पराभव नसून तो काँग्रेसचा पराभव आहे. मी कोणाचे नाव घेणार नाही, पण यामागे कोण आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. शिवाजीराव कव्हेकर, पराभूत माजी आमदार
राजकीय जीवनाचा शेवट
लातूर तालुक्यात २५ वर्षांपासून दहशतीचे आणि दबावाचे राजकारण सुरू आहे. पाच जागांवरचा विजय हा लोकांनी दहशतीविरोधात दिलेला कौल आहे. कव्हेकरांचा पराभव हा त्यांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे. त्यांचा पराभव करून लोकांनी त्यांना राजकारण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. दुसरे माजी आमदारही काठावर निवडून आले. त्यांनी इशारा लक्षात घ्यायला हवा. रमेश कराड, भाजप पॅनलप्रमुख
विजयी उमेदवार
काँग्रेस - वैजनाथ शिंदे, मनोज पाटील, ललित शहा, सुनीता पाटील, आशाबाई शिंदे,
हर्षवर्धन सवई, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, तुकाराम आडे.
भाजप - तात्याराव बेद्रे, संभाजी वायाळ, विक्रम शिंदे, विष्णू मोहिते, गोविंद नरहरे.