आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Rajnath Sing Visit To Jalna District

नदीजोड प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांची जालन्यात मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - काँग्रेस या देशात दीर्घकाळ सत्तेत राहिलेला पक्ष आहे. मात्र, त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि इच्छाशक्तीचा अभाव आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी शेतकर्‍यांचा विचार करून नद्याजोेड प्रकल्प हाती घेतला होता. काँग्रेसप्रणीत यूपीए-1 व यूपीए-2 सरकारच्या काळात हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना त्याचा मोठा लाभ झाला असता व जलपातळी वाढली असती. त्यामुळे केंद्र सरकारने याचा पुनर्विचार करावा, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.
दोन दिवसांच्या दुष्काळी दौर्‍यानिमित्त औरंगाबाद, जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले राजनाथसिंह मंगळवारी जालना येथे ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार रावसाहेब दानवे, माधव भंडारी, हरिभाऊ बागडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, राजनाथसिंह यांनी जालना शहरास पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी तलावाची पाहणी केली.
ते पुढे म्हणाले, शेतकर्‍याला त्याच्या जमिनीतून किमान किती उत्पन्न मिळेल याची माहिती पेरणीपूर्वीच निश्चित केली जावी आणि एखाद्या नैसर्गिक आपत्तीने त्याला अपेक्षित किमतीएवढे उत्पन्न मिळाले नाही तर उर्वरित रक्कम त्याला विमा योजनेतून दिली जाईल, अशी तरतूद असलेली कृषी आमदनी विमा योजना देशभरात लागू केली जावी, अशी मागणी केंद्राकडे आणि विशेषकरून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे करणार आहे.
या देशात शेतकरीच सर्वात मोठा उत्पादक व सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र, त्याची क्रयशक्ती कमी होत चालल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन भाजपशासित मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यांप्रमाणे शून्य टक्क्याने कर्जपुरवठा केला जावा, अशी मागणीही राजनाथसिंह यांनी या वेळी केली.

घाणेवाडी तलावाची पाहणी
शहराला पाणीपुरठा करणारा तलाव यंदा कोरडा पडला आहे. घाणेवाडी जलसंरक्षण मंचच्या वतीने तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राजनाथसिंह यांनी या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांना रमेशभाई पटेल यांनी उपक्रमाची माहिती दिली.

राजनाथसिंह यांनी मांडलेले मुद्दे
चारा छावण्या सुरू करण्यापेक्षा शेतकर्‍यांना रोख अनुदान द्यावे.
दुष्काळात होरपळणार्‍यांच्या मदतीसाठी उद्योजक, व्यापारी, नागरिकांनी पुढे यावे.
आयपीएलबाबत राज्यातील नेत्यांनीच निर्णय घ्यावा.
एनडीएची बांधणी मजबूत आहे व आम्ही एकत्रच आहोत. स्थिर सरकार अस्थिर करणार नाही.
भाजप देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असून आम्ही सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहोत.