आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-भाजपमुळे राज्य वेठीला: सुप्रिया सुळे, सरकार कायम इलेक्शन मोडवर असल्याने प्रशासन ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - केवळ राजकीय स्वार्थापोटी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी राज्यातील परिस्थिती अस्थिर करून ठेवली आहे. तामिळनाडूमध्ये सध्या जे चित्र आहे त्यासारखीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. युती सरकारच्या मंत्र्यांचा जास्तीत जास्त वेळ भांडणात जातो. तर मुख्यमंत्री कायम इलेक्शन मोडवरच असतात. त्यामुळे राज्याचे प्रशासन कसे सुरू आहे, याचे त्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या जालना येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.  

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. खासदार सुळे म्हणाल्या, नोटाबंदीनंतर शेतमालाचे भाव पडले, बेरोजगारी वाढली. शिवाय काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने नोटाबंदी केल्याचे सांगण्यात आले होते, मात्र काळा पैसा बाहेर आलाच नाही. त्यामुळे ही नोटाबंदी नव्हती तर नोटाबदली होती अशी टीका त्यांनी केली. 
 
राजीनामे खिशात ठेवून काय उपयोग?  
शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात ठेवले असल्याचे सांगत आहेत. मात्र ते खिशात ठेवून काय कामाचे? ते राज्यपालांकडे दिले पाहिजेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मध्यावधी निवडणुका राज्यासाठी परवडणाऱ्या नाहीत. मात्र शिवसेना-भाजप सत्तेच्या स्वार्थातून एकत्र असल्याने वेगळे होणार नाहीत. जर ते वेगळे झालेच तर राष्ट्रवादीची भूमिका शरद पवार यांनी यापूूर्वीच जाहीर केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
 
बातम्या आणखी आहेत...