आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधायक कामातून सेनेने भाजपवर साधला निशाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - गेल्या दशकापासून मराठवाड्याच्या पाठीमागे पाणीटंचाईचे शुक्लकाष्ठ लागले. तीन वर्षांपासून तर भीषण टंचाईमुळे शेतकरी, उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. टंचाई दूर करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने राबवली. त्याला प्रभावी करण्याचे काम आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे काही मंत्री त्याचे मार्केटिंगही करत आहे. या गवगव्याने राजकीयदृष्ट्या अस्वस्थ झालेल्या शिवसेनेनेही शिव जलक्रांती योजना हाती घेतली. राज्याच्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेने जलयुक्त शिवार आणि शिव जलक्रांती योजना राबवून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी या विधायक कामातून मराठवाड्यातील टंचाई काही प्रमाणात का होइना दूर होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.

सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेने विविध मुद्द्यांवरून भाजपला अनेक वेळा कांेडीत पकडले. नागपूर आणि मुंबई येथील अधिवेशनात तर ही बाब प्रकर्षाने दिसून आली. यात शिवसेनेचे जालना येथील आमदार अर्जुन खोतकर हे आघाडीवर होते. मराठवाड्याचा पाणी प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमुक्ती, शेतमालाचे भाव आदी विविध विषयांवर खोतकर यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले. एकीकडे सभागृहात आणि सरकारशी या मुद्द्यांवर संघर्ष करायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेसाठी काम करायचे अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आमदार खोतकर यांनी हा मुद्दा महत्त्वाचा केला. त्यांनी जालना तालुक्यातील वखारी, नाव्हा, पानशेंद्रा, बाजी उम्रद, मोतीगव्हाण आदी गावांतील तीनशे कामे पूर्ण केली. पुढाकार घेऊन त्यांनी लोकसहभागातून कुंडलिका नदीवर शिरपूर बंधारा बांधला.

आमची स्पर्धा नाही
जलयुक्त शिवार ही योजना सरकारची आहे. यामुळे टंचाई दूर होण्यास मदत होईल. शिवजलक्रांती ही योजना सेनेची आहे. प्रत्येक पक्षाला आपला अजेंडा राबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार ते शिव जलक्रांती ही योजना राबवत आहेत. आमची काही अंतर्गत स्पर्धा नाही.

पहिली योजना आमचीच
जलयुक्त शिवार योजना सुरू होण्यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव जलक्रांती योजना सुरू केली. हे काम यशस्वीपणे करतो आहोत. त्याचा चांगला लाभ झाला. आमची योजना आवडल्याने सरकारने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली असावी.