आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Supporters Beating In Parbhani, Divya Marathi

कोलांटउड्यांनंतर आता हातघाई, गंगाखेडच्या उमेदवारीवरून पदाधिकारी गुद्दागुद्दीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून रविवारी (दि. २८) भाजपच्या पदाधिका-यांत चांगलीच जुंपली. एका हॉटेलमध्ये उमेदवारीवरून झालेला वाद थेट गुद्दागुद्दीवर आला. दरम्यान, हे प्रकरण पक्षश्रेष्ठींकडे गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना-भाजपच्या २५ वर्षांच्या युतीत गंगाखेड हा एकमेव मतदारसंघ भाजपकडे होता. परभणी, पाथरी व जिंतूर हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे होते. गंगाखेडमधून भाजपने २००४ च्या निवडणुकीत यशही मिळवले होते, परंतु या वेळी महायुतीत फूट पडल्याने दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार येथे राहणे अपेक्षितच होते. मूळ भाजपचाच मतदारसंघ असल्याने व तेथीलच स्थानिक जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. परंतु पक्षाच्या नेतृत्वाने ही जागा महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्षाला दिली.
भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या गंगाखेड शुगर्सच्या रत्नाकर गुट्टेंनी रासपकडून उमेदवारी मिळाल्याने जिल्हाध्यक्ष रबदडे हे साहजिकच नाराज झाले. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश चिटणीस अ‍ॅड. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष रबदडे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सिटी पॅलेस हॉटेलमधून पाय-या उतरत असताना पूर्णा व गंगाखेड तालुक्यांतील पक्षाच्या दोघा ज्येष्ठ पदाधिका-यांत शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. त्या बाचाबाचीतून गंगाखेड तालुक्याच्या पदाधिका-यांच्या समर्थकांनी पूर्णा तालुक्याच्या त्या पदाधिका-याला चांगलीच धक्काबुक्की केली.