लातूर - लातूर जि.प.च्या स्थापनेपासून तेथे असलेली काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत भाजपने संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली तेथे आपला झेंडा रोवला. अंतर्गत मतभेद बाजूला सारून अत्यंत नियोजनपूर्वक प्रचारयंत्रणा राबवल्यामुळेच भाजपला हे यश मिळाले, तर दुसरीकडे जिल्ह्यात आपल्याशिवाय पर्याय नाही हा काँग्रेसजनांमध्ये असलेला अति आत्मविश्वास त्यांना नडला.
लातूर जि.प.वर स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसअंतर्गत गटांमध्ये सातत्याने वाद झाले तरी निवडणूक लढवताना हे गट एकत्र यायचे आणि जिंकायचे. प्रत्येक वेळी भाजप किंवा राष्ट्रवादी या जिल्ह्यातील काँग्रेसच्या विरोधकांना वरून ताकद मिळायची नाही.
विलासराव देशमुखांच्या नेतृत्वामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असे सगळ्याच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची तलवार लातूरमध्ये म्यान व्हायची अन् काँग्रेस बिनबोभाट निवडून यायची. प्रारंभीच्या पालकमंत्री पंकजा मुंडे हाच वारसा चालवत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडेंना हटवून संभाजी पाटील निलंगेकरांना लातूरचे पालकमंत्रिपद दिलं.
कॅबिनेट मंत्री करतानाच त्यांना लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परिवर्तन करण्याची जबाबदारी दिली. मुख्यमंत्र्यांच्या दट्ट्यामुळे मुंडेंचा गटही निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार झाला. त्यातच निलंगेकरांनी अहमपदपूरचे अपक्ष आमदार विनायक पाटील यांनाही पक्षात घेतलं. त्यामुळे ग्रामीणमध्ये भाजपची ताकद वाढली.
उदगीरमध्ये काँग्रेस नेते माजी आमदार चंद्रशेखर भोसलेंचं निधन झाल्यामुळे तिथे नेताच राहिला नव्हता. त्याचा फायदा भाजपला झाला. संभाजी पाटील यांनी आपलं नेतृत्व असलं तरी मृदू बोलणं ठेवत तालुक्यांऐवजी विधानसभा मतदारसंघनिहाय नियोजन केलं. त्या-त्या ठिकाणी आमदारकीसाठी इच्छुक आणि दावेदार असलेल्यांना उमेदवार निवडण्याची मुभा दिली. त्यांच्या इच्छेप्रमाणे तिकिटे दिली आणि प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
दुसरीकडे उमेदवार निवडणे, प्रचाराची यंत्रणा राबवणे ही कामे एकट्या देशमुख कुटुंबीयांनीच केली. निलंगेकर आणि चाकूरकर यांचे अस्तित्व केवळ बॅनरवरच्या फोटोपुरतेच राहिले. काँग्रेसकडे उमेदवारांचा ओढा होता, प्रचारसभांना मोठी गर्दीही होती, परंतु केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांबरोबर राहण्याचा पायंडा कायम ठेवत लातूरची जनता सत्तेबरोबर गेली.
हे ठरले चर्चेचे मुद्दे
- जि.प.मध्ये काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याचा भाजपचा आरोप
- विलासरावांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचाराचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख
- विलासरावांचे पुत्र धीरज अध्यक्ष होण्याएेवजी शेतकऱ्याला अध्यक्ष करणार
- देशमुख विरुद्ध निलंगेकर असा वादविवाद रंगला