बीड - ‘मला १२७ कला अवगत आहेत. मी तुमच्या मैत्रिणीच्या घरी पैशांचा पाऊस पाडून तुमच्यावरील कर्जही फेडतो’, अशी थाप मारून महिलेला ६० हजार रुपयांचा गंडा घालणा-या अजय सीताराम श्रीवास्तव (रा. ठाणे) या भोंदूबाबावर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांची चाहूल लागताच हा भोंदूबाबा फरार झाला.
बीड शहरातील अप्रे निवास येथे राहणारी महिला सुवर्णा दिगंबर चव्हाण व अजय सीताराम श्रीवास्तव या दोघांनी पैशांचा पाऊस पाडतो म्हणून काही महिलांकडून पैसे उकळले होते. शहरातील एमआयडीसी भागातील नवनाथनगर येथील महिला कविता रवींद्र जाधव यांची मैत्रीण अनिता यांच्या घरी पैशाचा पाऊस पाडतो, अशी थाप मारून दोन महिलांकडून ८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रत्येकी ३० हजार असे ६० हजार रुपये उकळले हाेते. पावसासाठी पैसे देऊनही पाऊस पडला नसल्याने
आपली फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर बुधवारी रात्री कविता जाधव यांनी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून भोंदूबाबा अजय श्रीवास्तव याच्यासह सुवर्णा चव्हाण या दोघांवर जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.