आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळा पैसा पांढरा केला; बँक ऑफ महाराष्ट्रचे तीन कर्मचारी निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - उदगीर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील चार कर्मचाऱ्यांनी कमिशन घेऊन सुमारे १९ लाखांची रक्कम बदलून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या चौघांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त असून शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापकांनी मात्र याला दुजोरा दिला नाही.
जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर देशभरातील बँक कर्मचारी लोकांच्या सोयीसाठी अतिरिक्त काम करून सेवेत असतानाच उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील चार कर्मचाऱ्यांनी ही संधी समजून उखळ पांढरे करून घेतले. ३० टक्के दराने १००० आणि ५०० च्या नोटांऐवजी जुन्या १०० च्या नोटा देण्याचा काळा धंदा सुरू असल्याचे कळताच बँक कर्मचारी विकास कदम याच्यासह इतर तीन कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना तब्बल १९ लाख रुपये बदलून दिल्याची माहिती आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाखा व्यवस्थापकाने ही माहिती लातूरमधील वरिष्ठांना दिली; परंतु त्यांच्या स्तरावरून कसलीच कारवाई झाली नाही. त्यानंतर ही माहिती पुण्यातील मुख्य कार्यालयात देण्यात आली. तेथून आलेल्या पथकाने तातडीने कारवाई करून चौघांना निलंबित केले.

काँग्रेसच्या आंदोलनानंतर नावे जाहीर
आरोपी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे पाहून काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोषी कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक चंद्रकांत दवणे यांनी विशाल कदम, शिवरत्न आघाव, रियाज कासार आणि नरसाबाई मुंडे अशी नावे जाहीर केली. त्यांनी विशाल देवणे या व्यापाऱ्याला सुमारे १८ ते १० लाख दिल्याचे समजते. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत बँकेकडून फिर्याद देण्यात आली नव्हती.

वरिष्ठही सामील? : या प्रकरणात लातूर येथील काही वरिष्ठही सामील असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एकाही जबाबदार अधिकाऱ्याने मंगळवारी दुपारपर्यंत ठाण्यात फिर्यादही दिलेली नाही. त्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद होत आहे. शाखा व्यवस्थापकाने आपल्या शाखेतील सर्व नोटांचे हिशेब घेतले नाहीत काय? देशभरात नोटांवरून कल्लोळ सुरू असताना बँकेचे अधिकारी इतक्या निष्काळजीपणे कसे वागले? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
वरिष्ठांची लपवाछपवी : सोमवारपासूनच बँकेच्या कर्मचाऱ्यांत याबाबत कुजबुज सुरू होती. मात्र, ही माहिती बँकेबाहेर कुणालाही देण्यात येऊ नये, अशी तंबी लातूरमधील वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना दिल्याचे समजते. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचे कळाल्यानंतर लातूरमध्ये असलेल्या बँकेच्या विभागीय कार्यालयाचे प्रमुख महेश बन्सवानी यांनी पत्रकारांना कसलीच माहिती दिली नाही. पुण्यातील मुख्य कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्या, एवढे एकच पालुपद त्यांनी आळवले. आरोपी कर्मचाऱ्यांना याच कार्यालयात दडवून ठेवल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याबाबत माहिती विचारल्यानंतर पत्रकारांनाच दमदाटी करण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची मजल गेली. पुण्यात संपर्क साधल्यानंतरही तेथे केवळ फोन इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यातच चार तास खर्ची झाले. मात्र, माहिती कुणीही दिली नाही.
बातम्या आणखी आहेत...