आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला, वैद्यनाथ निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक पहिल्यांदाच आरोप-प्रत्यारोपाने गाजत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तालुका ढवळून निघाला असून संचालक मंडळाच्या सर्वच जागेवर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आमने-सामने आल्याने चुरशीची लढत होत आहे.

१९९८ मध्ये केंद्रात पंतप्रधान ॲटलबिहारी वाजपेयी यांचे तेरा दिवसांचे सरकार सत्तेवर आले होते. केंद्रीय राजकारणातील भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यामार्फत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यास परवानगी मिळवली होती. अवघ्या तेरा महिन्यांत कारखान्याची उभारणी झाल्याने तालुक्यातील पाचशे युवकांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली. तीन वर्षांपूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्थानिक राजकारणातील ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेच पाहत होते. त्यामुळे कारखान्यात पंडितअण्णा मुंडे यांच्या शब्दाला फार मोठी किंमत होती.

वैद्यनाथ कारखान्याने सलग सोळा वर्षे उसाचे गाळप केले आहे. आशिया खंडात वैद्यनाथ कारखान्याचा बोलबाला झाला होता. जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा भाव देण्याचा वैद्यनाथने दिला. पहिल्या दोन निवडणुकांच्या वेळी मुंडे घराणे एकत्र असल्याने विरोधकांचे कधी सभासदत्व, तर कधी उमेदवारी अर्ज बाद व्हायचे. त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोधच निवडून यायच्या. परंतु काही वर्षांपूर्वी पुतणे धनंजय मुंडे हे काका गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर परळीचे राजकारण बदलू लागले. परळी मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यातच विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्याने परळीला दुसरा लाल दिवा मिळाला. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच वैद्यनाथची निवडणूक होत आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक, तर दुसरे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल आहे. भाजपच्या पॅनलमध्ये पंकजा मुंडे, बहीण यशश्री मुंडे, आ. आर. टी. देशमुख, फुलचंद कराड, विद्यमान उपाध्यक्ष नामदेव अघाव आदींचा समावेश आहे. पंडितअण्णा मुंडे व धनंजय मुंडे यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने सर्व उमेदवाऱ्या कार्यकर्त्यांनाच द्याव्या लागल्या आहेत.

उसाचे पैसे दिले नाहीत
तुमच्याच कार्यकर्त्यांमुळे बंद कराव्या लागलेल्या सूतगिरणीवर आरोप करण्यापेक्षा ज्या कारखान्याची निवडणूक आहे त्या निवडणुकीतील सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत दाखवा. तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिलेले नाहीत.
आ. धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

सभासद थारा देणार नाहीत
विरोधकांकडून होणाऱ्या आरोपात तथ्य नाही. कारखान्याचे एकही कर्जाचे खाते थकीत नाही. कारखान्यावर कर्ज आहे. आरोप करणारांची सूतगीरणी कर्जबाजारी असल्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. जातील तिथे कर्जबाजारी संस्था करणाऱ्यांना सभासद थारा देणार नाहीत.
पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री